commercial pilot: जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय पूर्ण करता येतं हे सिद्ध करुण दाखवलं आहे, साताऱ्यातील पळशी गावातील चिराग डोईफोडे या तरुणानं. साताऱ्यातील पळशी गावातील चिराग डोईफोडे हा तरुण पायलट झाला आहे, त्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याला दुसरा कर्मशिअल पायलट मिळाला आहे. चित्रपट निर्माते, देवमाणूस या मालिकेतील ‘लाला ‘फेम डॉ. शशिकांत डोईफोडे यांचा मुलगा चिराग डोईफोडे हा अवघ्या २३ व्या वर्षी कमर्शिअल पायलट झाला आहे.
मुलगा वैमानिक होऊ दे, हनुमानाला नवस बोललो होतो –
सातारा जिल्ह्याचे विविध क्षेत्रात नाव चमकले असले तरी हवाईक्षेत्र त्याला अपवाद होता. या क्षेत्रातही जिल्ह्याचे नाव चमकले असून चिराग डोईफोडेच्या रुपाने दुसरा कमर्शियल पायलट जिल्ह्याला मिळाला आहे. “मुलगा पायलट झाल्यास हनुमानाला मंदिरावर पुष्पवृष्टी करेन” असा नवस बोललो होतो, असं शशिकांत डोईफोडे यांनी सांगितलं. मुलगा पायलट झाल्यानंतर चिराग डोईफोडेच्या वडिलांनी थेट हेलिकॉप्टरमधून ग्रामदैवत हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करत आपला आनंद साजरा केला. मुलगा पायलट झाल्याने शशिकांत डोईफोडे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दरम्यान मुलगा हेलिकॉप्टरमधून उतरताच त्याला मिठी मारली तेव्हा त्यांना अश्रू अनावर होत होते.
चिरागने दीड वर्षात कठीण परीक्षा पास केल्या –
चिरागचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. परंतु चौथीनंतर पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी तो बारामती येथे गेला. लहानपणासून त्याला पायलट होण्याची इच्छा होती. बारावी पास झाल्यानंतर त्याने डीजीसीए अंतर्गत विविध परीक्षा दिल्या. यानंतर दीड ते दोन वर्षांमध्येच त्याने परीक्षा उत्तीर्ण केल्या.
हेही वाचा – पोलिसच मोडतात नियम! आम्हीही असा विनाहेल्मेट प्रवास केला तर? फोटो ट्वीट करत विचारणा, मुंबई पोलीस म्हणाले…
नुकताच त्याला पायलटचा परवाना मिळाला आहे. सातवीत असताना मुलाने जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या आईवडिलांना झाला असून हवाईक्षेत्रात अनेक संधी आहेत, त्याचा शोध घेऊन मुलांनी त्यात प्राविण्य मिळवण्याची गरज आहे, असा सल्ला चिराग डोईफोडेच्या आई-वडिलांनी दिला आहे.