हो मागील शंभर वर्षांपासून पुण्याची ओळख असणाऱ्या चितळे बंधूंनी आपलं नाव बदलत असल्याची घोषणा केलीय. पुणे आणि चितळे बंधू हे जणू समिकरणच झालं आहे. दुपारचे बंद दुकान हा पुण्यातील चितळे बंधूंबद्दल बोलताना कायमच चेष्टेचा विषय असल्याचे पहायला मिळतं. मात्र २०१७ च्या सुरुवातीलच ‘चितळे बंधू’ यांनी दुपारी एक ते चार दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही आजही अनेकदा चितळे बंधूंना यावरुन ट्रोल केलं जातं. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चितळे बंधू चर्चेत आहेत ते त्यांच्या बदललेल्या नावासाठी.
नक्की वाचा >> “माझ्याकडे ‘चितळे बंधूं’वर जोक आहे पण…”; ट्रोल करणाऱ्याला चितळेंकडून ‘पुणेरी टोमणा’, म्हणाले…
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण उंबरठय़ावर आलेला असताना राखीसह अन्य भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागलीय. या सणाला आवर्जून घेतल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे मिठाई. तसा सण कोणताही असला तरी किंवा नसला तरी चितळेंचं दुकान आणि खवय्यांची गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. पण १०० वर्षांपासून सुरु असणारी ही परंपरा आणि नाव यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त चितळेंनी बदलायचा निर्णय घेतलाय. चितळेंनीच यासंदर्भात एक व्हिडीओ जारी करत माहिती दिलीय.
नक्की वाचा >> बाकरवडी की भाकरवडी?; चितळे बंधूंनीच दिलं उत्तर
चितळे हे त्यांच्या पदार्थांबरोबरच हटके जाहिरातींसाठीही ओळखले जातात. तशीच एक जाहिरात त्यांनी यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त प्रदर्शित केलीय. गुरुवारी प्रदर्शित झालेली ही जाहिरात सध्या सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घाततेय. करोनाच्या पार्श्वभूमीवर या जाहिरातीमधील कथानक असून यामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री स्पृहा जोशी आणि निर्मिती सावंतही आहेत. या जाहिरातीमध्ये संकर्षण आणि स्पृहा हे आई-बाबा दाखवण्यात आले असून त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या कार्यक्रमाला ते आशा ताईंची वाट बघत असतात. सर्व पाहुणे आल्यानंतरही स्पृहा आणि संकर्षण आशा ताईंसाठी थांबलेले असतात. अखेर आशाताई म्हणजेच निर्मिती सावंत बारश्याला पोहचतात आणि या दोघांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं.
हे दोघेही आपल्या छोटीचं नाव आशाताईंनीच ठेवावं असं सांगतात. यावेळेस संकर्षण ही गरोदर असताना करोनाची लागण झाली तेव्हा आशा ताईंनी तिची सेवा केली असं सांगत याच कारणानिमित्त आम्ही त्यांना आमच्या मुलीचं नाव देण्याचा मान देतोय असं सांगतात. खरं तर नर्सला सिस्टर्स का म्हणतात हे आम्हाला आशाताईंमुळेच कळालं असं संकर्षण सांगतो. कठीण काळामध्ये महाराष्ट्रातल्याच नव्हे देशातील लाखो सिस्टर्सने असंख्य भावांचं आणि त्यांच्या परिवाराचं प्राणपणाने रक्षण केलं. म्हणूनच चितळे बंधू मिठाईवाले आजच्या रक्षाबंधनाच्या दिवसानिमित्त होतातयत ‘चितळे बंधू भगिनी मिठाईवाले’, असं या जाहिरातीमध्ये शेवटी सांगण्यात आलंय. कवी वैभव जोशी यांनी जाहिरातीला आवाज दिलाय.
नक्की वाचा >> कौतुकास्पद… चितळे बंधू कर्मचाऱ्यांसाठी बांधतायत निवासस्थान; पार पडलं इमारतीचं भूमिपूजन
“आपल्या जगण्याचा गोडवा ज्यांनी ज्यांनी वाढवला, त्या सगळ्या भगिनींना आम्हा बंधूंकडून ही आदराची, प्रेमाची भेट!”, असं म्हणत ही जाहिरात चितळेंच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलीय.
चितळेंची लोकप्रियता
शास्त्रीय संगीतात जशी गाण्यात घराणी असतात, तशी खाण्याची घराणी असती तर त्यातलं ठळक नाव असतं ‘चितळे’ घराणं. चितळे म्हणजे विशिष्ट शैली. चितळ्यांच्या घराण्यानं पदार्थांना खास चव, दर्जा दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तीनचार पिढ्यांनंतरही टिकवून ठेवल्याने आज केवळ महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात चितळेंच्या प्रोडक्ट्सला चांगली मागणी आहे. या घराण्याच्या चवीचं व्याकरण निर्माण केलं भास्कर गणेश चितळे यांनी १९२० मध्ये. सातारा जिल्हय़ातल्या या छोटय़ाशा गावात सुरू झालेल्या आणि १९३९ मध्ये सांगली जिल्हय़ातल्या ‘भिलवडी’त स्थलांतरित झालेल्या दुधाच्या घरगुती व्यवसायाचं बघता बघता प्रचंड मोठ्या उद्योगात रूपांतर झालं. प्रतितास तीनशे किलो या हिशोबानं दररोज साडेचार टन बाकरवडी तयार होते. दसरा-पाडवा वा कुठलाही सण, पुणेकरांना चितळेंच्या दुकानात जायला जणू पर्याय नसावा असं चित्र.