Famous Church In India Christmas Celebration 2023 : वर्षाचा शेवटा महिना आणि नाताळची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तुम्ही दिवस आणि ठिकाण शोधत आहात. पण आता काळजी नको. आम्ही तुम्हाला येशू ख्रिस्तांच्या सुंदर आणि पवित्र स्थानांबद्दल सांगणार आहोत, तिथे तुम्ही यंदाची नाताळची सुट्टी अविस्मरणीय आणि एकदम आनंदात घालवू शकता. येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस देशभरात ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात, आनंदात हा दिवस साजरा होतो. अशावेळी हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही भारतातील काही प्रसिद्ध चर्चमध्ये जाऊन ख्रिसमसचा आनंद घेऊ शकता. विशेष म्हणजे या चर्च केवळ भारतातच नाही तर अगदी जगभरात प्रसिद्ध आहेत. अगदी विदेशी पर्यटकही इथे नाताळसाठी खास येऊन सेलिब्रेशनचा आनंद घेतात.
भारतातील ‘ही’ आहेत प्रसिद्ध चर्च
सेंट पॉल कॅथेड्रल, कोलकाता
दुर्गा पूजेशिवाय कोलकाता हे ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी खूप प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. यामुळे तुम्ही यंदा कोलकाता येथील सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये जाऊन ख्रिसमस सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता. या चर्चचे बांधकाम १८४७ मध्ये पूर्ण झाले. सेंट पॉल त्याच्या स्थापत्यकलेसाठी तसेच त्याच्या अतुलनीय सौंदर्यासाठी ओळखले जाते. हे चर्च आशियातील पहिले एपिस्कोपॅलियन चर्च आहे, जे प्रामुख्याने कलकत्त्याच्या वाढत्या ख्रिश्चन समुदायाच्या सेवेसाठी बांधले गेले आहे.
बॅसिलिका ऑफ बॉम जिसस, गोवा
गोव्यात जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ख्रिसमस साजरा करण्यासाठी एखाद्या सुंदर चर्चच्या शोधात असाल तर तुम्ही गोव्यातील बेंग्युनिम येथे असलेल्या बॅसिलिका ऑफ बॉम जिसस चर्चमध्ये जाऊ शकता. साधारण ३०० वर्षांपूर्वी या चर्चची स्थापना करण्यात आली होती. हे चर्च युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे आणि येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष पाहायला मिळतात. ख्रिसमसच्या दिवशी इथले वातावरण खूपच मोहून टाकणारे असते. अत्यंत उत्साही आणि खूप सुंदर वातावरणात इथे नाताळ साजरा करण्यात येतो.
इमॅक्युलेट कन्सेप्शन कॅथेड्रल, पुद्दुचेरी
या वर्षाच्या शेवटच्या महिन्याचा आनंद तुम्ही पुद्दुचेरीमध्ये घेऊ शकता. येथे तुम्ही ख्रिसमसच्या दिवशी इमॅक्युलेट कन्सेप्शन कॅथेड्रलला भेट देऊ शकता. या चर्चला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचे शांत वातावरण तुमच्या मनालाही शांतता देईल.
वल्लारपदम बासिलिका चर्च, केरळ
दक्षिण भारतातही तुम्हाला अनेक प्रसिद्ध चर्च पाहायला मिळतील. केरळमधील वल्लारपदम बासिलिका चर्च दक्षिण भारतातील सर्वात मोठे चर्च म्हणून ओळखले जाते. १५२४ मध्ये पोर्तुगाल शासकांनी या चर्चची निर्मिती केली. हे राज्यातील दर्शनीय पर्यटन स्थळ असल्याने दरवर्षी अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात. या चर्चची वास्तू आकर्षक आणि मनमोहक आहे. नाताळच्या दिवशी या चर्चची विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटक गर्दी करतात.
क्राइस्ट चर्च, शिमला
जर तुम्हाला डोंगराळ आणि बर्फाच्छादित थंड ठिकाणी जाऊन डिसेंबरच्या सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या यादीत शिमल्याचा समावेश केला पाहिजे. येथे तुम्हाला अनेक प्राचीन चर्चदेखील पाहायला मिळतात. येथील देशातील प्रसिद्ध चर्चपैकी एक असलेल्या क्राइस्ट चर्चमध्ये तुम्ही ख्रिसमस सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता. इंग्रजांच्या काळातील हे बांधलेले चर्च आजही शिमला शहराची शान आहे. या चर्चला राजधानीचा ताज असे म्हटले जाते. आजही या चर्चचे सौंदर्य पाहून पर्यटक भारावून जातात.