नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव देण्यात यावं यावरुन सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राचा पाठवण्याची तयारी सुरु केली असतानाच. दुसरीकडे स्थानिकांनी मात्र रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी केलीय. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन असून त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळच राहील असं म्हटलं आहे. हा नामांतराचा वाद सुरु झाल्यानंतर अनेक आंदोलने करण्यात येत आहे.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला आहे. हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या उत्तराने ट्विटरवर अनेकांना हसू आवरले नाही.

नवी मुंबई विमानतळ नामकरण: राज ठाकरेंच्या मताशी लोक सहमत, पाहा #LoksattaPoll चा निकाल

ट्विटरवर सक्रिय असलेल्या पुरी यांनी गायक-अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती २०१९ सालच्या जुन्या ट्विटला उत्तर दिले. या ट्विटमध्ये सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी बंता याने नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र पाठवून विमानतळाचे नाव बंताक्रूझ ठेवावे अशी विनंती केल्याचे म्हटले आहे. कारण त्याचा भाऊ संता याच्या नावावर सांताक्रूझ हे विमानतळ आहे. या ट्वीटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत मंत्री पुरी यांनी असा प्रस्ताव आला नसल्याचे म्हटले आहे. “सध्या आणि निर्माणाधीन विमानतळांचे नाव बदलण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाला अनेक विनंत्या येत आहेत. मूड जरा हलका करण्यासाठी मला माझ्या मित्र बंताला सांगायचे आहे की त्याचा नावाचा औपचारिक प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही!” असे पुरी यांनी ट्विट केले आहे.

मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराला नेटिझन्सनेही प्रतिसाद दिला आहे.  मूळ ट्विट केलेल्या गायक-अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी देखील पुरी यांच्या विनोदाचे कौतुक केले. तर युजर्सनेदेखील पुरी यांच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले.


दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरताना दिसत असताना पुरी यांनी हे ट्विट केले आहे. दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतून जाणारा शीव-पनवेल मार्गावरील बेलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून सर्व वाहतूक शीळफाटा मार्गे वळविण्यात आली. दरम्यान ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असला तरी वाहतूक कोंडी झाली होती.