CJI Chandrachud reveals he moonlighted as a radio jockey: भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांसाठी ओळखले जातात. देशातील न्यायव्यवस्थेमधील सर्वोच्च पदावर असलेल्या चंद्रचूड यांची न्यायदानाची पद्धती आणि सर्वसमावेशक निर्णय कायमच चर्चेचा आणि कौतुकाचा विषय राहिले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती चंद्रचूड यांच्या निर्णयांचं कौतुक करताना दिसतात. चंद्रचूड यांनी अनेकदा मूलभूत हक्कांच्या संरक्षणासंदर्भात दिलेले निर्णय आणि खास करुन सोशल मीडियाचं स्वातंत्र्य जपण्यासंदर्भातील दिलेले निर्णय हे कौतुकाचा विषय ठरले आहेत. अनेकदा चंद्रचूड यांच्या आधुनिक विचारसणीची झलक या निर्णयांमधून पहायला मिळाल्याचं कायदेविषयक तज्ज्ञ मंडळी सांगताना दिसले.
अनेक प्रकरणांमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका
मागील काही वर्षांमध्ये अयोध्या, गोपनियतेचा अधिकार, शबरीमाला प्रकरण, शाहबुद्दीने शेख एन्काऊंटर प्रकरण आणि इतर अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये निकाल देताना न्या. चंद्रचूड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नवी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात बी.ए. झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या संकुल विधि केंद्रातून चंद्रचूड यांनी एलएलबीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम आणि ज्युरिडिकल सायन्सेसमध्ये डॉक्टरेट मिळवली.
असं झालं शिक्षण
सर्व्हिलीयन आणि क्रॉमवेल या कायदेविषयक कंपनीमध्ये चंद्रचूड यांनी सुरुवातीला काम केलं. नंतर ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करत होते. कनिष्ठ वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठात तुलनात्मक घटनात्मक कायदा विषयाचे मानद प्राध्यापक म्हणून ही त्यांनी काम पाहिलं. जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. २००० साली ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झाले. त्यानंतर ते अलाहबाद उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश झाले.
नक्की वाचा >> कनिष्ठ वकील गुलाम नाहीत, त्यांना योग्य वेतन द्यायला हवं- धनंजय चंद्रचूड
मूनलायटींग करायचे चंद्रचूड
मात्र आज न्यायव्यवस्थेमधील सर्वोच्चस्थानी असलेल्या चंद्रचूड यांच्या करियरचा ग्राफ हा फारच रंजक आहे. नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये चंद्रचूड यांनी आपण वयाच्या विशीमध्ये ऑल इंडिया रेडिओसाठी रेडिओ जॉकी म्हणून काम करायचो असं सांगितलं. ‘प्ले इट कूल’, ‘डेट वीथ यू’ तसेच ‘संडे रिक्वेस्ट’सारख्या कार्यक्रमांसाठी आपण काम करायचो, असं चंद्रचूड म्हणाले. हा एक प्रकारचा मूनलायटींग प्रकारचा जॉब होता असंही त्यांनी सांगितलं. मूनलायटींग म्हणजे एकाच वेळी दोन नोकऱ्या करणे ज्यात दुसऱ्या ठिकाणची नोकरी पहिल्या नोकरदात्याला न कळू देता केली जाते. सामान्यपणे ही दुसरी नोकरी नियमित रोजगाराच्या ठिकाणी काम संपल्यानंतर उरलेल्या वेळात केली जाते. म्हणजेच चंद्रचूड यांच्या सांगण्यानुसार ते न्यायालयामध्ये काम करताना रेडिओसाठीही लपूनछपून काम करत होते.
नेमकं काय म्हणाले चंद्रचूड?
“अनेकांना याची कल्पना नसेल पण मी मूनलायटींग प्रकारची नोकरी केली असून ती रेडिओ जॉकीची नोकरी होती. माझ्या वयाच्या २० व्या वर्षी मी ऑल इंडिया रेडिओसाठी नोकरी केली. यावेळी मी ‘प्ले इट कूल’, ‘डेट वीथ यू’ तसेच ‘संडे रिक्वेस्ट’सारख्या कार्यक्रमांसाठी काम केलं,” असं चंद्रचूड म्हणाले. ‘बेंच अॅण्ड बार’ने ट्वीटरवरुन या भाषणातील ही क्लिप ट्वीट केली आहे. “संगीताबद्दल मला आजही तितकेच प्रेम आहे. त्यामुळेच आजही मी वकील म्हणून रोजचं संगीत (प्रकरणांची सुनावणी) ऐकल्यानंतर खरं संगीत ऐकण्यासाठी आवर्जून वेळ काढतो,” असं चंद्रचूड यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> “…म्हणून न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं मोठं वक्तव्य
९ डिसेंबर रोजी चंद्रचूड हे सरन्यायाधीश म्हणून एका महिन्याचा कार्यकाळ पूर्ण करतील. देशाच्या लोकांची सेवा करण्यास आपले प्राधान्य असणार आहे. सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यास मी प्राधान्य देणार आहे. तुम्ही पाहाल की, मी देशाच्या सर्व नागरिकांसाठी काम करणार आहे. मग ते तंत्रज्ञान असो की रजिस्ट्री, किंवा मग न्यायालयीन सुधारणा असोत, मी सर्वच बाबतीत लोकांच्या दृष्टीने काळजी घेईन, असं चंद्रचूड यांनी ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर म्हटलं होतं.