Dadar Viral Video : मुंबई स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी म्हणजे रेल्वेस्थानकांबाहेर पालिकेने क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली आहे; जे मुंबईतील रेल्वेस्थानकांबाहेर गुटखा, सिगारेट ओढणाऱ्या आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्या, कचरा फेकणाऱ्यांकडून दंड वसूल करतात. हे क्लीन अप मार्शल अस्वच्छता करणाऱ्यांकडून जवळपास २०० ते एक हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करताना दिसतात. पण, मुंबईत नव्याने आलेल्या लोकांशी ते दंडवसुलीच्या नावाखाली दादागिरी करीत असल्याचे प्रकारही यापूर्वी समोर आले आहेत. सध्या दादर रेल्वेस्थानकाबाहेरील क्लीन अप मार्शलचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तीन क्लीन अप मार्शल सिगारेट, गुटखा विक्रीच्या दुकानासमोरचे उभे राहून कारवाई करताना दिसतायत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुंबई पालिकेची कारवाई करण्याची ही कोणती पद्धत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
नियम फक्त इतर लोकांसाठी आहेत का?
तुम्ही मुंबईत रेल्वेने प्रवास करताना पाहिलं असेल की, बोरिवली, मालाड, अंधेरी, दादर अशा गर्दीच्या रेल्वेस्थानकांबाहेर एकाच ठिकाणी तीन ते चार क्लीन अप मार्शल उभे असतात, जे गुटखा खाऊन चालणाऱ्या, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करताना दिसतात. दोषी आढळणाऱ्या संबंधित व्यक्तींना बाजूला घेऊन, ते दंड वसूल करताना दिसतात. पण, अनेकदा दंडवसुलीच्या नावाखाली ते सर्वसामान्यांची लूट करीत असल्याचे व्हिडीओ यापूर्वीही समोर आलेत. अनेकदा रेल्वेस्थानकाबाहेर अनेक रिक्षा वा टॅक्सीचालक सर्रासपणे गुटखा, पान खाऊन थुंकतात. बिनधास्त सिगारेट ओढताना दिसतात; पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नियम फक्त इतर लोकांसाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. इतकेच नाही, तर काही रेल्वेस्थानकांच्या बाहेर पदपथावर लोक मल-मूत्र, कचरा आदींद्वारे अस्वच्छता करून, तेथेच राहतातही. मग त्यांच्यावर का कारवाई होत नाही, असा बोचरा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
तुम्ही दादर स्थानकाबाहेरील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहू शकता की, एक तरुण दादर स्थानकाबाहेर एक क्लीन अप मार्शल कशा प्रकारे अगदी सिगारेट, गुटखा विक्रीच्या दुकानासमोर उभा राहून लोकांक़डून दंड वसूल करतोय हे दिसतेय. एकाच वेळी तीन ते चार क्लीन अप मार्शल एकाच ठिकाणी उभे राहून कारवाई करताना दिसतायत. यावेळी एक तरुण व्हिडीओ शूट करीत असे म्हणताना ऐकू येतेय की, दादर स्थानकाबाहेर फालतूची वसुली सुरू आहे, २०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. इथे सिगारेट ओढण्यास बंदी घातली जात नाही, तर लोकांना समोरच्याच दुकानातून सिगारेट विकत घेऊ दिले जातेय, उभे राहून ओढू दिले जातेय. त्यानंतर समोरच उभे असलेले हे क्लीन अप मार्शल आरामात अशा लोकांकडून दंडही वसूल करतायत.
यावेळी तो तरुण क्लीन अप मार्शलचे ओळखपत्र दाखवताना दिसतोय; पण क्लीन अप मार्शलच्या मदतीने सुरू असलेली ही दंडवसुली कितपत योग्य आहे. असा सवाल उपस्थित होत आहे. गुटखा खाऊन थुंकणाऱ्या, सिगारेट ओढणाऱ्या लोकांचे समर्थन करायचे नाही; पण ही दंडवसुली फक्त सर्वसामान्य मुंबईकर आणि मुंबईत नव्याने आलेल्या लोकांपुरतीच मर्यादित आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.