CM Devendra Fadanvis Viral Video : महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडवणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी संबंधित एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले. त्यामध्ये एक दिव्यांग मुलगी देवेंद्र फडणवीसांच्या कपाळावर पायाने टिळा लावताना दिसत आहे. अनेक जण हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरचा आहे, असा दावा करीत पोस्ट शेअर करीत आहेत. पण, खरंच हा व्हिडीओ त्यादरम्यानचा आहे का? याबाबतचे सत्य आपण जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @NaMo_Bharathan ने त्यांच्या प्रोफाईलवर दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओ डाऊनलोड केला आणि तो InVid टूलद्वारे त्याची तपासणी सुरू केली.
आम्ही व्हिडीओवरून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च केले.
यावेळी आम्हाला एक वर्षापूर्वी फेसबुकवर रील म्हणून अपलोड केलेला एक व्हिडीओ आढळला.
आम्हाला २८ जून २०२३ रोजी फ्री प्रेस जर्नलच्या एक्स हॅण्डलवर हा व्हिडीओ अपलोड केलेला आढळून आला.
आम्हाला अनेक वेबसाइटवर काही बातम्यांमध्येही त्या व्हिडीओतील एक स्क्रीनशॉट आढळून आला आहे. या बातम्या जून २०२३ मध्ये प्रकाशित झाल्या होत्या.
https://www.latestly.com/socially/india/news/devendra-fadnavis-meets-divyangs-at-event-in-jalgaon-photo-of-specially-abled-girl-applying-tilak-on-maharashtra- deputy-cms-forehead-goes-viral-5229705.html
बातम्यांमध्ये म्हटले आहे की : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच जळगाव येथील दिव्यांग मुलांसाठी दीपस्तंभ फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘मनोबल’ उपक्रमाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी ‘मनोबल’ उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांच्या भेटीदरम्यानचे काही फोटो आणि त्याचे तपशील सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोत फडणवीस दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांशी संवाद साधताना आणि वेळ घालवताना दिसले. एका फोटोत एक दिव्यांग मुलगी फडणवीसांच्या कपाळावर ‘टिळा’ लावताना दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – Indian Railways : ट्रेनचं तात्काळ तिकीट बुकिंग करण्यापूर्वी जरा थांबा! आधी ‘या’ बदललेल्या वेळा एकदा वाचा
हा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवर शेअर केला आहे.
निष्कर्ष:
देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ रोजी ‘दीपस्तंभ फाउंडेशन’च्या मनोबल या उपक्रमांतर्गत विशेष दिव्यांग मुलांची भेट घेतली होती. त्यावेळी एका दिव्यांग मुलीने त्यांना पायाने टिळा लावून ओवाळले होते. हा तोच व्हिडीओ अलीकडचा असल्याचा दावा करीत व्हायरल होत आहे. त्यामुळे व्हायरल केला जाणारा दावा दिशाभूल करणारा आहे.