पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंगळवारी मुंबईमध्ये ‘जल भूषण’ या राज्यपालांच्या कार्यालय व निवासस्थान असलेल्या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त बऱ्याच दिवसांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकाच मंचावर दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण करताना आपल्या खास शैलीमध्ये राज्यपालांनाच मंचावरुन एक ऑफर दिली. ही ऑफर ऐकून सभागृहामधील सर्वच उपस्थित मान्यवर हसू लागले.
नक्की वाचा >> “मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजभवन येथे क्रांती गाथा या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उदघाटन करण्यात आले. ही ब्रिटिशकालीन भुयारे २०१६ मध्ये आढळून आली होती. दारूगोळा व अन्य सामग्री साठवण्यासाठी त्याचा उपयोग होत होता. इतिहासकार आणि लेखक डॉ. विक्रम संपत यांच्या संकल्पनेतून क्रांती गाथा दालन तयार करण्यात आले असूनच याच दोन वास्तूंचे उद्घाटन मोदींच्या हस्ते काल पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यासारखे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांसमोर भाषण करताना उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या नव्या घराचं कौतुक करत एक खास ऑफर दिली.
नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या सत्काराच्या वेळी ‘मोदी… मोदी’ घोषणाबाजी; Video पोस्ट करत भाजपाचे IT सेल प्रमुख म्हणाले, “फक्त पुढची…”
उद्धव यांनी काय ऑफर दिली?
भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या नव्या निवासस्थानाचं कौतुक केलं. ‘या वास्तूचं जसं नुतनीकरण झालं, तसं जल भूषण जिकडे आपल्या राज्यपालांचं निवास्सथान आहे,’ असं म्हणत उद्धव यांनी राज्यपालांकडे पाहून पुढे, “फार मोठं आणि खूप चांगलं घर बांधलंय तुम्ही” असं म्हटलं. यानंतर सभागृहामध्ये एकच हसू फुटलं. पुढे उद्धव यांनी, “एक्स्चेंज करायचं का?” असंही मिश्कीलपणे विचारलं. यानंतरही सभागृहातील उपस्थित मान्यवर हसू लागले. पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजभवनातील दालन हे प्रेरणादायी तीर्थस्थळच ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
इच्छा नसताना महाराष्ट्रात पाठवलं
पंतप्रधान मोदी यांनी मला इच्छा नसताना मोठय़ा विश्वासाने महाराष्ट्रात पाठविले, असे कोश्यारी यांनी मोदींच्या उपस्थितीतच सांगितले. महाराष्ट्र हा सुंदर प्रदेश आहे, इथे समुद्र आहे. मी उत्तराखंडचा आहे. तेथे हिमालय आहे, पण समुद्र नाही. मात्र येथे हिमालय नाही, अशी टिप्पणी कोश्यारी यांनी केली.
नक्की वाचा >> “अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी…”; अजित पवारांना भाषण न करु दिल्याने रोहित पवारांनी कठोर शब्दांत व्यक्त केला संताप
मोदी काय म्हणाले भाषणात?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात असताना त्यांच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाचा गौरव करीत राजभवनातील ब्रिटिशकालीन तळघरे (बंकर्स) गेल्या ७० वर्षांत सापडली नाहीत, असा टोला पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात लगावला. स्वातंत्र्यलढय़ात लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, अनेक क्रांतिकारक यांनी आपल्या मार्गाने योगदान दिले. स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसच्या माध्यमातून मोठे कार्य केले. त्यांचे निधन १९३० मध्ये झाले. अस्थी जतन करून ठेवाव्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात आणाव्यात, असे त्यांनी सांगितले होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे काम कोणी केले नाही. त्यासाठी ७३ वर्षे जावी लागली, असे सांगत मोदींनी काँग्रेसवर शरसंधान केले. त्यांच्या अस्थी मी २००३ मध्ये देशात आणल्या आणि गुजरातमध्ये नेवून तेथे इंडिया हाऊसची उभारणी केली, असंही मोदी म्हणाले.