– योगेश मेहेंदळे
कॅपिटल फर्स्ट या कंपनीचे अध्यक्ष व्ही वैद्यनाथन यांनी कंपनीला मोठं करण्यासाठी मेहनत घेतलेल्या आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना चक्क 20 कोटी रुपयांचे शेअर्स भेट म्हणून दले आहेत. कॅपिटल फर्स्टच्या एका शेअरचा भाव शुक्रवारी 480 रुपयांचा आसपास होता. ही कंपनी लवकरच आयडीएफसी बँकेत विलिन होत आहे. 2010 मध्ये ही कंपनी स्थापन केल्यापासून तिला आत्ता यशाच्या शिखरावर आणण्यासाठी ज्या ज्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली, त्या सगळ्यांची नावं कृतज्ञतापूर्वक नोंदवत, त्यांना आपण हे शेअर्स भेट देत असल्याचं वैद्यनाथन यांनी बाँबे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंजला कळवलं आहे.
वैद्यनाथन यांच्याकडे स्वत:च्या मालकिचे 40,40,576 शेअर्स असून यातील तब्बल 20 कोटी रुपयांचे 4,29,000 शेअर्स त्यांनी आपले 26 सहकारी, 11 नातेवाईक व एक वैयक्तिक ड्रायव्हर यांना भेट दिले आहेत. या सहकाऱ्यांमध्ये तीन जण तर माजी आहेत, म्हणजे जे आत्ता त्यांच्यासोबत काम करत नाहीत. या सर्व सहकाऱ्यांना वैद्यनाथन यांनी स्वत:च्या मालकिचे प्रत्येकी 11 हजार शेअर्स (ज्यांची आजची किंमत सुमारे 53 लाख रुपये आहे) भेट दिले आहेत. आपल्या कंपनीला मोठं करण्यात ज्यांनी हातभार लावला त्यामध्ये गणती करताना वैद्यनाथन स्वत:च्या व्यक्तिगत ड्रायव्हरला व घरकाम करणाऱ्यांनाही देखील विसरले नाहीत. त्यांनी ड्रायव्हरलाही 6,500 म्हणजे सुमारे 31 लाख रुपयांचे शेअर भेट दिले आहेत. माजी सहकाऱ्यांबद्दल त्यांनी म्हटलंय की भलेही ते आता कंपनीत नसतील, परंतु कंपनी सोडण्याआधी त्यांनी जे योगदान दिलंय व कंपनीच्या वाढीसाठी त्यांनी जे परीश्रम घेतले ते विसरता येणार नाहीत.
कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला दिलेलं पत्र संपूर्ण वाचण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.
सतीश गायकवाड या कॅपिटल फर्स्टच्या कंपनी सेक्रेटरींनी लिहिलेल्या पत्रात हे नमूद केलंय की, केवळ प्रेम व कृतज्ञतेपोटी ही भेट देण्यात येत असून कुठल्याही प्रकारचं करनियोजन नाहीये. वैद्यनाथन यांनी ज्या नातेवाईकांना शेअर्स भेट दिलेत, त्यामध्येही त्यांच्या वारशांचा समावेश नाही. भाऊ, बहीण, मेहुणी, पत्नीचे काका-मामा आदींचा समावेश आहे. आपल्या सहकाऱ्यांना एकूण 2,86,000, नातेवाईकांना 1,10,500 व ड्रायव्हरला 6,500 शेअर्स वैद्यनाथन यांनी दिले आहेत. आपण गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या कामाची कंपनीचा अध्यक्ष अशी दखल घेताना बघून या सगळ्या सहकाऱ्यांना नक्कीच समाधान व दिवाळीत अनपेक्षित लाभ मिळाल्याचा आनंद झाला असेल यात शंका नाही.