तरुणांना बाइक चालवण्याचं प्रचंड आकर्षण असतं. यासाठी प्रत्येकाला स्वत:ची बाइक असावी असं वाटत असतं. यासाठी एक तर तरुण घरच्यांकडे तगदा लावतात किंवा गाडी घेण्यासाठी मेहनत करतात. मात्र तामिळनाडुतील एका तरुणाने गाडी विकत घेण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. तरुणाने एक-एक रुपयांची नाणी जमा करत २.६ लाख रुपये जमवले. तामिळनाडूतील सेलम शहरात राहणाऱ्या २९ वर्षीय व्ही. बूपाथीने बाइक घेण्यासाठी १ रुपयांची नाणी गोळा केली. बुपती एका खासगी कंपनीत कंप्यूटर ऑपरेटर आहे. तसेच एक यूट्युबरदेखील आहे. बुपतीने सांगितले की, “गेल्या ३ वर्षांपासून बाइकसाठी १ रुपयाची नाणी गोळा करत आहेत. ३ वर्षांपूर्वी बाइक घ्यायची होती. तेव्हा या बाइकची किंमत २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. पण माझ्याकडे पैसे नव्हते, त्यानंतर मी ठरवले की मी प्रत्येकी एक रुपया जमा करीन आणि ही बाइक घेईन.”
बुपतीला बजाज डोमिनार ४०० मॉडेलची बाइक खरेदी करायची होती. बुपथी दुचाकी घेण्यासाठी गेले असता त्याच्याकडे पैसे देण्याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा बूपथी याने नाण्यांनी भरलेली मोठी बॅग बाहेर काढली. एवढी मोठी बॅग पाहून शोरूममधील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही नाणी मोजण्यासाठी शोरूममधील कर्मचाऱ्यांना १० तास लागले.
Video: दोन कावळे आणि मांजराचा व्हिडीओ पोस्ट करत आनंद महिंद्रा म्हणाले, “एकत्र काम केलं तर…”
शोरूमचे व्यवस्थापक महाविक्रांत यांनी सांगितले की, “सुरुवातीला ते ही नाणी घेण्यास नकार देणार होते, परंतु बुपतीला निराश करायचे नव्हते. त्यामुळे त्याने नाण्यांद्वारे पैसे देण्याचे मान्य केले. एक लाख रुपये जमा करण्यासाठी बँक त्यांच्याकडून १४० रुपये आकारेल. बुपतीने दिलेली नाणी मोजण्यासाठी सुमारे १० तास लागले. बुपती, त्याचे चार मित्र आणि शोरूमचे पाच कर्मचारी या कामात गुंतले होते. नाण्यांची मोजणी संपल्यावर आम्ही त्याला बाइक दिली.”