लग्नाच्या सीझन मध्ये सोशल मीडियावर नवविवाहित कपल्सचे फोटो अगदी धुमाकूळ घालत असतात. हे सर्व पाहून बिचारी सदैव सिंगल मंडळी मात्र मिम्स बनवून आपलं मन हलकं करतात. हा साधारण दरवर्षीचा ट्रेंड आहे. प्रत्येक सीझनला फेसबुक, इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडियावर आपल्या फ्रेंडलिस्ट मधील अनेकांचे #CoupleGoals आपण पाहतो किंबहुना पाहावेच लागतात. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अलीकडेच स्टॅन्ड अप कॉमेडियन अनमोल गर्गने अत्यंत मजेशीर अशी पोस्ट करत आपण विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली. या पोस्ट साठी त्याने FB, Insta नव्हे तर थेट LinkedIn गाठलं, त्याने निवडलेलं हे माध्यम व त्याची एकूणच पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चला तर आपणही पाहुयात या पोस्ट मध्ये नेमकं असं काय लिहिलंय..
प्रोफेशनल आयुष्यातील यश LinkedIN वर अनेकजण शेअर करत असतात. आपण अमुक ठिकाणी नोकरीसाठी रुजू झालो, आपल्याला तमुक पदावर प्रमोशन मिळालंय, आपण व्यवसाय केलाय अशा धाटणीच्या या पोस्ट असतात. अनमोलने सुद्धा आपल्या पोस्ट मध्ये अशाच पद्धतीने आपलं लग्न झाल्याची माहिती दिली आहे.
अनमोल गर्गची Viral पोस्ट ….
“हे सांगताना आनंद होतो की मी पूर्णवेळ पती म्हणून नवीन पद सुरू करत आहे ! माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि हा टप्पा गाठण्यात मला मदत केल्याबद्दल मी माझ्या सह-संस्थापकांचे, माझ्या आई आणि वडिलांचे आभार मानू इच्छितो.
हे काम मला 7 वर्षांपूर्वी देण्यात आले होते जे मी पूर्ण केले, माझ्या पालकांनी दिलेले नवे काम पुढील 2 वर्षांत अतिरिक्त मानव संसाधन तयार करेल. त्यांनतर मी माझ्या पालकांना सांगितले आहे, ‘मी तुमच्याकडे परत येईन’.
मला माझे सहकारी – माझी बहीण, सौ. अंकिता गर्ग, जिने मला सतत मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत.
सरतेशेवटी, मी माझ्या जोडीदार, सौ. अंजली गुप्ता यांचे आभार मानू इच्छितो की, त्यांच्याकडे अनेक ऑफर असतानाही माझी निवड केली. CTC ऐवजी, तिने एकूणच नोकरीतील समाधान निवडले. आम्ही दोघांनी एकमेकांमध्ये भावनिक गुंतवणूक केली आहे. काही व्हॅनिटी मेट्रिक्सनुसार, आमची प्रेमकथा आधीच एक युनिकोर्न प्रमाणे आहे. पण हा युनिकॉर्न फायदेशीर बनवण्याचा आमचा निर्धार आहे
मी माझ्या LinkedIn कुटुंबाचे त्यांच्या सतत समर्थनासाठी आभार मानू इच्छितो! “
दरम्यान या पोस्ट वर अनमोलच्या फॉलोअर्सनी मजेशीर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी अभिनेता अमेय वाघने सुद्धा आपल्या लग्नाच्या वेळी आपण ड्रायव्हर म्हणून नवी नोकरी सुरु करत आहोत असे म्हणत गंमतीशीर पोस्ट केली होती. तुम्हाला ही हटके पोस्ट कशी वाटली कमेंट करून कळवा.