मागील काही वर्षांमध्ये भारतामध्ये स्टॅंडअप कॉमेडीचे प्रमाण वाढले आहे. लोक या क्षेत्राकडे करीअर म्हणून पाहायला लागले आहेत. आपल्याकडे फार आधीपासून स्टॅंडअप कॉमेडी केली जात होती. जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव असे मातब्बर लोक त्यांच्या-त्यांच्या पद्धतीने स्टॅंडअप करत लोकांना पोट धरुन हसवत असत. पुढे पश्चिमेकडील देशांमध्ये स्टॅंडअप कॉमेडीचे वारे वाहू लागले. त्याचा परिणाम भारतामध्येही झाला आणि मॉडर्न स्टॅंडअप कॉमेडियन्स उदयास येऊ लागले. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळल्याने यामध्ये अधिक लोक सहभागी होऊ लागले.
पण काही कालावधीनंतर लोक स्टॅंडअप कॉमेडियन्सचा विरोध करु लागले. त्यातही घाणेरडे विनोद करत ते हिंदू धर्मांचा अपमान करत असल्याचे त्यांच्यावर आरोप होऊ लागले. यावरुन काही कॉमेडियन्सवर कायदेशीर कारवाईचा देखील सामना करावा लागला. असाच प्रकार कॉमेडियन यश राठीबरोबर घडला आहे. त्याच्या स्टॅंडअप शोमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये यश राठी प्रभू राम यांची मस्करी करत असल्याचा आरोप अनेक हिंदू संघटनांना केला आहे. एकूण प्रकरणामुळे यश राठी विरोधात पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
काय म्हणाला यश राठी?
देहरादूनमध्ये आयोजित केलेल्या स्टॅंडअप कॉमेडी शोमध्ये यश राठीने येशू ख्रिस्त आणि भगवान राम यांच्यावरुन काही विनोद केले. “येशू ख्रिस्त पाण्यावर चालायचे. पण जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पाण्यावर चालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते पाण्यात पडले. सहकार्यांना त्यांना पाण्यातून बाहेर काढले. पुढे सहकारी त्यांना ‘तुमच्यात अतिआत्मविश्वास आहे’ असे म्हणाला. तेव्हा येशू सहकाऱ्यांना संबोधत ‘एक छोटीशी चूक झाली. मी माझ्या चपलांवर राम लिहायला विसरलो असे म्हटले” असा विनोद यश राठी केल्याचे त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम, फेसबुक अशा साईट्सवर व्हायरल झाला आहे. नेटकरी भगवान राम यांचा अपमान केल्यामुळे या स्टॅंडअप कॉमेडीयनवर भयकंर रागावले आहेत. जनतेकडून यश राठीला मोठा विरोध होत आहे. काहीजणांनी त्यांचे स्टॅंडअप कॉमेडी शो बंद पाडा असे म्हटले आहे. तर काहींना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणामुळे आणखी एक स्टॅंडअप कॉमेडियन धार्मिक वादामध्ये अडकल्याचे पाहायला मिळते.