बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून देशासाठी दररोज पदक जिंकत आहेत. जवळपास प्रत्येक खेळात खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहेत. ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय अभिमानाची बाब आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाण्याऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक दिले जाते. मात्र हे पदक खरंच सोने आणि चांदीपासून बनलेले असतात का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया आणि या पदकांबद्दल अधिक माहिती मिळवूया.
राष्ट्रकुल २०२२ च्या पदकांची रचना तीन विद्यार्थ्यांनी केली आहे. हे विद्यार्थी बर्मिंगहॅम स्कूल ऑफ ज्वेलरीमध्ये शिकतात. अंबर अॅलिस, फ्रान्सिस्का विल्कॉक्स आणि कॅटरिना रॉड्रिग्स कैरो अशी त्यांची नावे आहेत. ब्रिटनमध्ये मेडल डिझाइन करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हे तिन्ही विद्यार्थी विजयी झाले.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी तयार करण्यात आलेल्या मेडलमध्ये बर्मिंगहॅमचा नकाशाही तयार करण्यात आला आहे. अंध खेळाडूंना जाणवू शकेल अशा पद्धतीने या पदकांची रचना करण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पदकांचे वजन किती असेल. सुवर्ण आणि रौप्य पदकांचे वजन १५० ग्रॅम आहे. त्याच वेळी, कांस्यपदक १३० ग्रॅमचे आहे. या पदकांचा व्यास ६३ मिमी आहे.
अंगणातील स्विमिंग पूलमुळे ‘हे’ जोडपं झालं कोट्याधीश; कमाई पाहून तुम्हीही व्हाल थक्क
एका वृत्तानुसार, या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण १८७५ पदके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी २८३ स्पर्धांमध्ये ही पदके दिली जाणार आहेत. त्याच वेळी, १३ मिश्र स्पर्धा असतील. स्टॉकहोममध्ये १९१२ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सोन्याने बनवलेले सुवर्णपदक देण्यात आले होते. तथापि, राष्ट्रकुल स्पर्धेत अशा पदकांचा वापर कधीच झाला नव्हता.
खेळांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक दिले जाते. विजेत्या खेळाडूंना देण्यात येणारी सुवर्णपदके सोन्याची नसतात. त्यात फक्त सोन्याचा मुलामा चढवला आहे. तथापि, रौप्य आणि कांस्य पदके पूर्णपणे चांदी आणि तांबे यांनी बनलेली आहेत.
दरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्यपदकांसह एकूण ५५ पदके जिंकली आहेत.