‘एज’ (Edge) या आपल्या ब्राउझरच्या वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी बलाढय सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट नवी योजना राबवत आहे. सर्वाधिक वापरात असलेल्या ‘गुगल क्रोम’, ‘मोझिला फायरफॉक्स’ आणि ‘ओपेरा’ ब्राउझरपेक्षा ‘एज’ ब्राउझर बॅटरीचा कमी वापर करतो असा दावा त्यांच्यातर्फे करण्यात आला आहे. ‘एज’ ब्राउझरच्या वापराने ३६ ते ५३ टक्क्यांपर्यंत बॅटरीची बचत होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. इतकेच नव्हे तर ‘एज’ वापरणाऱ्यांना कमाईदेखील करता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘एज’ वापरणाऱ्यांना मायक्रोसॉफ्ट रिवॉर्डसाठी नोंदणी करावी लागणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. ‘एज’ ब्राउझरचा वापर करणाऱ्यांना वेळोवेळी रिवॉर्ड पॉइंट्स देण्यात येतील. ‘बिंग’ या त्यांच्या सर्च इंजिनसाठीदेखील याआधी मायक्रोसॉफ्टने अशाप्रकारची योजना राबवली होती. मायक्रोसॉफ्ट रिवॉर्ड्स पहिल्यांदा बिंग रिवॉर्ड्स नावाने प्रसिध्द होते. अलिकडेच याचे नाव बदलण्यात आले असले तरी ब्राउझरसाठी तशाच प्रकारची रणनिती कंपनीने अवलंबविली आहे. या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट स्टोअरमधून शॉपिंग केल्यासदेखील रिवॉर्ड पॉइन्ट्स मिळवता येतील. या योजनेअंतर्गत पॉइन्ट्स मिळविण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन ‘बिंग’ला डिफॉल्ट सर्च इंजिन बनवावे लागेल. वापरकर्त्याने ‘एज’ ब्राउझरचा वापर एका महिन्यात ३० तासांपेक्षा जास्त केला आहे अथवा नाही यावरदेखील मायक्रोसॉफ्टतर्फे लक्ष ठेवण्यात येईल. नंतर मायक्रोसॉफ्ट वापरकर्त्यांला पॉइंट्स देईल, जे व्हाउचर्स अथवा क्रेडिटच्या माध्यमातून वापरता येतील. हे पॉइंट्स अॅमेझॉन, स्टारबक्स आणि outlook.com वरदेखील वापरता येतील.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2016 रोजी प्रकाशित
…या ब्राउझरच्या वापराने करू शकता कमाई
'एज' ब्राउझरचा वापर करणाऱ्यांना वेळोवेळी रिवॉर्ड पॉइंट्स देण्यात येतील.
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-08-2016 at 20:36 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company will pay you to use the microsoft edge browser