ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं वयाच्या ६४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. १९७४ ते अगदी २०१६ दरम्यान आपल्या भारदस्त आवाजाने महाराष्ट्रातील घराघरांमध्ये ऐकू येणारा बातम्यांचा आवाज अशी ओळख भिडे यांनी तयार केली.  मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज भिडे यांच्या जाण्याने हरपलाय. भिडे यांच्या निधनानंतर अनेक राजकारण्यांनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भिडे यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

नक्की वाचा >> “पुनर्जन्म असेल तर देवाने पुढील जन्मात मला…”; प्रदीप भिडेंनी ‘एवढीच त्याच्याकडे प्रार्थना’ म्हणत व्यक्त केलेली इच्छा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडे यांच्या निधनासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ अशी ओळख असणारे भिडे हे खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तीमत्व होतं. भिडे यांच्या निधनाचे वृत्त समसल्यानंतर अनेक नेत्यांनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने दुरदर्शन बातम्यांचा बुलंद मराठी आवाज हरपला आहे. परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्रदान करो, तसेच भिडे कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरिता शक्ती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली.” – एकनाथ शिंदे (शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकामंत्री, महाराष्ट्र राज्य)

“ज्येष्ठ वृत्तनिवेदक, सुत्रसंचालक प्रदिप भिडे यांचे निधन झाले. टिव्ही पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून दिलेली सेवा अविस्मरणीय आहे.त्यांच्या निधनामुळे भारदस्त आवाजाचे धनी असणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.” – सुप्रिया सुळे (खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस)

“बातम्या सांगण्याच्या अनोख्या शैलीमुळे दूरदर्शनचा चेहरा बनलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. भिडे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,” – बाळासाहेब थोरात (कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते)

“श्री प्रदीप भिडे यांच्या निधनामुळे पत्रकार सृष्टी एका सच्च्या पत्रकाराला मुकली. अतिशय लोभस आणि राजबिंडं व्यक्तिमत्त्वाचे प्रदीप भिडे त्यांच्या खास आवाज आणि लकबीमुळे कायम लक्षात राहतील. त्यांनी अनेक दर्जेदार कार्यक्रम दिले. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.” – प्रकाश जावडेकर (भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री)

“नमस्कार मी प्रदीप भिडे, तुम्ही बघत आहात ७ च्या बातम्या मराठीतून… हा आवाज ऐकण्यासाठी ९० च्या दशकात मराठी माणूस सायंकाळी ७ वाजण्याकडे लक्ष देऊन असायचा… हाच आवाज आपल्यातून हरपला… भिडे हे वृत्त निवेदनातले मानबिंदू होते.. भावपुर्ण श्रद्धांजली.” – चित्रा वाघ (भाजपा नेत्या)

“दूरदर्शनवर बातम्या पाहिल्या की आपलासा वाटावा असा आवाज आणि चेहरा असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे हे आपल्या भारदस्त आवाजातील वृत्तनिवेदनासाठी प्रसिद्ध होते. श्री. प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांना सद्गती प्रदान करो! ॐ शांती.” – प्रसाद लाड (भाजपा आमदार)

“सह्याद्री वाहिनी व दूरदर्शनचे सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाल्याची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या भारदस्त व संवेदनशील आवाजात संध्याकाळी सातच्या बातम्या आम्ही आवर्जून पहायचो.” – अमोल कोल्हे (खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस)

“दूरदर्शनचा पडदा रांगत होता, तेव्हा तारुण्याबांड प्रदीप भिडे यांच्या बातम्या सांगण्याच्या पद्धतीनं सगळ्यांना आकर्षित केलं. भारदस्त आवाज, उच्चार आणि भाषाशुद्धीमुळे प्रदीप भिडे पुढे लोकप्रिय झाले. त्यांच्या निधनाने अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भावपूर्ण आदरांजली, ओम शांती.” – चंद्रकांत पाटील (भाजपा प्रदेशाध्यक्ष)

“प्रदीप भिडे! दूरदर्शनच्या ‘आजच्या ठळक बातम्या’ ऐकण्याचा छंद ज्या आवाजाने लोकांना लावला तो आवाज आज हरपला. वृत्तनिवेदनातलं कौशल्य, भाषेची उत्तम जाण, भारदस्त आवाज आणि व्यक्तिमत्त्व असणारे प्रदीप भिडे वृत्तनिवेदन शैलीचा खरोखरच वस्तुपाठ होते. प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” – विनोद तावडे (भाजपा नेते)

“ज्येष्ठ वृत्तनिवेदक श्री प्रदीप भिडेजी यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दुःख झाले. बातम्या सांगण्याच्या खास शैलीमुळे दूरदर्शन वाहिनीचा चेहरा म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झाली होती. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” – मनोज कोटक

शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा १९९५ मध्ये शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेही काही जाहीर कार्यक्रम आणि अशा अनेक महत्त्वाच्या राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भिडे यांनी केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Condolences pour in form all political party leaders for pradeep bhide scsg