Aditya L1 Mission: चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संस्थेने (ISRO) आता सूर्याकडे झेप घेतली आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य-L1’ अंतरयानचे श्रीहरिकोटा येथून आज २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले. लाँचिंगच्या १२७ दिवसांनी यान एल-१ अचूक कक्षेपर्यंत पोहचल्यानंतर ते सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असं ‘इस्रो’नं सांगितलं आहे. आदित्य-L1 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर लोक सोशल मीडियावर इस्रोचे अभिनंदन करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२५ दिवसांत १५ लाख किलोमीटरचे अंतर कापणार –

आदित्य-L1 च्या माध्यमातून वादळ, सौर लहरी आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सूर्यातून येणारी उष्णता आणि उष्ण वारे यांचाही अभ्यास आदित्य करणार आहे. ‘आदित्य L1’ ला १२५ दिवसांत सुमारे १.५ दशलक्ष किलोमीटर अंतर कापून Lagrangian पॉइंट ‘L1’ भोवती प्रभामंडल कक्षेत ठेवण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी केलं इस्रोचे अभिनंदन –

ISRO चे अभिनंदन करताना, अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं, “भारताच्या पहिली सौर मोहिम, आदित्य-L1 चे प्रक्षेपण, ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे जी भारताच्या स्वदेशी अंतराळ कार्यक्रमाला एका नवीन मार्गावर घेऊन जाते. हे आम्हाला अंतराळ आणि खगोलीय घटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल मी इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन करते. मिशनच्या यशस्वीतेसाठी माझ्या शुभेच्छा.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, “चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अवकाश प्रवास सुरूच आहे. भारताच्या पहिल्या सौर मोहिमेच्या, आदित्य-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. सर्व मानवतेच्या फायद्यासाठी विश्वाची अधिक चांगली समज विकसित करण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील.”

इतर प्रतिक्रिया –

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लिहिलं, “इस्रोचे खूप खूप अभिनंदन. #AdityaL1 चे अत्यंत यशस्वी प्रक्षेपण, भारताचे सूर्याचा अभ्यास करण्याचे महत्वाकांक्षी अभियान. संपूर्ण देश अत्यंत उत्साही आहे आणि आपल्या सुपर सायंटिस्ट्सबद्दल अत्यंत अभिमान वाटत आहे. त्याची सर्व उद्दिष्टे पूर्ण करतील या सदिच्छा.”
तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लिहिले, “सूर्य देवाला नमस्कार…. #AdityaL1 लाँच केल्याबद्दल ISRO चे अभिनंदन. हे मिशन आजच्या भारताची भावना प्रतिबिंबित करते, जो महत्वाकांक्षी उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यात निर्भय आहे.”

चांद्रयानच्या यशानंतर पुन्हा एकदा इस्रोने आदित्य एल1 हे महत्त्वाचे मिशन सुरू केले आहे. यावर लोक सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. चांद्रयानचा आनंद अजून कमी झाला नसताना आणखी एक आनंदाची बातमी आली असल्याचं लोक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congratulation showered on isro as aditya l1 mission successfully launched prime minister along with president praised jap
First published on: 02-09-2023 at 17:22 IST