Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला आणि सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो ट्रेंड होऊ लागले. मोठ्या अवधीनंतर पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सोनिया गांधी या आपला सुपुत्र राहुल गांधी व अन्य काँग्रेस नेत्यांसह दिसून आल्या. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात सोनिया गांधी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या घोषणाबाजी व जयजयकारात भारत जोडो यात्रा केली. यामध्ये राहुल गांधी व सोनिया यांचा एक फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
राहुल गांधी यांच्यावर अनेकदा टीका होत असल्या तरी त्यांच्या मातृप्रेमाचे सर्वचजण दाखले देतात. यावेळी सुद्धा राहुल व सोनिया गांधी यांच्या सुंदर नात्याची साक्ष देणारा फोटो व्हायरल होत आहे. आपण पाहू शकता की, या फोटोत राहुल यांनी सोनिया गांधी यांचे अक्षरशः पाय धरले आहेत. सोनिया यांच्या शूजची लेस बांधण्यासाठी राहुल गांधी अगदी भररस्त्यात गुडघ्यावर बसून लेस बांधत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करून राहुल यांना श्रावणबाळ म्हंटले आहे.
अन राहुल गांधी ठरले श्रावणबाळ
याआधीही यात्रेच्या ११ व्या दिवशी एका व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हे एका लहान मुलीला तिच्या चप्पल घालण्यात मदत करताना दिसले होते. महिला काँग्रेसच्या कार्यवाहक अध्यक्ष नेट्टा डिसूझा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. “साधेपणा आणि प्रेम. देशाला एकसंध ठेवण्यासाठी दोघांची गरज आहे,” असे डिसोझा यांनी हिंदीमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले होते.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला कोविड मधून बरे झाल्यानंतर सोनिया गांधी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी दीर्घकाळापासून पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा निवडणूक प्रचारात सहभागी होत नव्हत्या.