काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकताच वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क असा ट्रक प्रवास केला. १९० किमीचा हा प्रवास त्यांनी ट्रकने केला. त्यावेळी त्यांनी ट्रक चालक तेजिंदर गिलशी चर्चाही केली. याचा व्हिडीओ राहुल गांधींच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रवासादरम्यान अमेरिकेतल्या ट्रक चालकाशी राहुल गांधींनी संवाद साधला. तुम्ही महिन्याला किती पैसे कमवता? हा प्रश्न विचारल्यानंतर ट्रक चालकाने जे उत्तर दिलं ते ऐकून राहुल गांधी चकीत झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांनी यापूर्वी भारतातल्या अमृतसरमध्ये ट्रकने प्रवास केला होता आणि भारतातल्या ट्रक चालकांशीही संवाद साधला होता. आता राहुल गांधी यांनी अमेरिकेतला ट्रक चालक तेजिंदर गिलसह प्रवास केला. यावेळी ट्रक चालकाच्या शेजारच्या सीटवरच राहुल गांधी बसले होते. त्यांनी अमेरिकेत ट्रक चालक महिन्याला साधारण किती पैसे कमावतो असा प्रश्न तेजिंदर यांना केला. एवढंच नाही तर भारताच्या तुलनेत अमेरिकेतला ट्रक हा किती आरामदायी आणि ड्रायव्हरचा विचार करुन तयार करण्यात आला आहे यावरही चर्चा केली. भारतातले ट्रक हे चालकाचा विचार करुन तयार केलेले नाहीत असंही राहुल गांधी म्हणाले.

हे पण वाचा : ट्रकने प्रवास करत राहुल गांधींनी जाणून घेतल्या चालकांच्या समस्या, व्हिडीओ व्हायरल

राहुल गांधींशी संवाद साधत असताना तेजिंदरने सांगितलं की अमेरिकेत ट्रकच्या सुरक्षेवर प्रचंड भर दिला गेला आहे. तसंच या ठिकाणी आम्हाला कुठलाही पोलीस अडवत नाही. ट्रकमधून काही चोरी होण्याचाही धोका नाही. पण एक आहे आम्ही जर ओव्हर स्पीड केला तर आम्हाला त्यासाठी दंड भरावा लागतो असं या चालकाने सांगितलं.

किती कमाई करता असं ट्रक चालकाला राहुल गांधींनी विचारलं

तुम्ही महिन्याला किती कमाई करता? असा प्रश्न राहुल गांधी यांनी ट्रक चालक तेजिंदर गिल यांना विचारलं. त्यावर तेजिंदर म्हणाला की आम्ही महिन्याला ८ ते १० हजार डॉलर कमावतो. भारताच्या तुलनेत विचार केला तर ही रक्कम ८ लाख रुपये महिना इतकी होते. हे उत्तर ऐकून राहुल गांधीही चकित झाले. या ट्रकच्या क्षेत्रात भरपूर पैसे मिळतात. ज्या लोकांकडे गुंतवणूक करायला पैसे नाहीत त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे असंही उत्तर तेजिंदरने दिलं.

भारताच्या चालकांना तेजिंदरने दिला खास संदेश

भारताच्या ट्रक चालकांना तेजिंदरने खास संदेश दिला आहे. तेजिंदर म्हणाला की तुम्ही खूप मेहनत घेऊन तुमचं काम करत असता. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्यानंतर तेजिंदर हे पण म्हणाला की भारतात राहून ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण आहे. मात्र इथे तसं नाही. तसंच भारतात हेही पाहण्यास मिळतं की अनेकदा ट्रक चालकाचा नसतो. ते फक्त त्या ट्रकचे चालक म्हणून काम करतात, मालक वेगळा असतो. इथे तसं नाही. इथे आम्हीही लोन काढून ट्रक खरेदी करतो. लोन सहजरित्या मिळून जातं.

ट्रकमध्ये चालकाने लावलं सिद्धू मुसेवालाचं गाणं

ट्रक प्रवासादरम्यान चालकाने राहुल गांधींना विचारलं की तुम्ही गाणं ऐकणार का? त्यावर राहुल गांधी यांनी हो म्हटलं. ट्रक चालकाने सिद्धू मुसेवालाचं गाणं लावलं. त्यावर राहुल गांधी म्हणाले की सिद्धू मुसेवाला काँग्रेसचा होता. मात्र त्याच्या हत्येनंतर अजूनही त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. मला त्याची गाणी आवडतात. राहुल गांधी आणि तेजिंदर यांनी एकत्र नाश्ताही केला तसंच तिथे असलेल्या लोकांसह आणि तेजिंदरसह राहुल गांधींनी फोटोही काढले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi in us travel with truck ask him monthly income scj
Show comments