आजकाल मोबाइलवर खेळल्या जाणाऱ्या अनेक ऑनलाइन गेमची क्रेझ लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आहे. मोबाइलवर सतत गेम खेळत बसल्यामुळे वेळेसह पैशांचं नुकसान होतं असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना अशा गेमपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. शिवाय अशा गेम्समुळे शालेय विद्यार्थ्यांवर चुकीचे परिणाम होतात, असंही सांगितलं जातं. मात्र, उत्तर प्रदेशातील एका महिलेचं नशीब याच मोबाइलमधील गेममुळे पालटलं असून ती एका रात्रीत करोडपती बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधील जिल्हा कारागृहात तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नीने रातोरात एक कोटी रुपये जिंकले आहेत. कॉन्स्टेबल देवेश मिश्राची पत्नी अर्चना यांनी रविवारी ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग साइटवर एक टीम तयार केली. ज्यामध्ये त्यांनी एक कोटी रुपये जिंकले. इतकेच नव्हे तर बोनस म्हणून त्यांना आयफोन आणि रॉयल एनफिल्ड बुलेटही मिळाली आहे. ही घटना व्हायरल होताच अनेकांनी अर्चना यांचे अभिनंदन करण्यासाठी घरी गर्दी केली होती. ऑनलाइन गेममधून कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर अर्चना म्हणाल्या, “मला माझे नशीब अशा प्रकारे साथ देईल असे कधीच वाटले नव्हते.” अर्चना या देवरिया येथील रहिवासी आहेत, तर त्यांचा नवरा संत कबीर नगर येथे कॉन्स्टेबल आहेत.
हेही पाहा – VIDEO : गाड्यांमध्ये साचलेलं पाणी आणि रस्त्यावर पडलेले खांब; मिचौंग चक्रीवादळामुळे लोकांचे प्रचंड हाल
दरम्यान, याआधी महाराष्ट्रातील पुण्यात एका पोलिस अधिकाऱ्याने ड्रीम ११ वर अशाच प्रकारे टीम तयार करून १.५ कोटी रुपये जिंकले होते. परंतु, हे पैसे जिंकणे त्यांना महागात पडलं होतं. कारण ‘ड्रीम ११’ या ऑनलाइन स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मवर गेमद्वारे पैसे जिंकणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर पोलिस विभागाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, ज्यामुळे त्यांना विभागीय चौकशीला नक्कीच सामोरे जावे लागले होते.
“जुगार नव्हे कौशल्य”
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या वेबसाइटवर (ड्रीम ११) २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे. त्यानुसार, ‘ड्रीम ११ ‘चे प्लॅटफॉर्म देशाच्या जुगार संबंधित कायद्यांच्या कक्षेत येत नाही. भारतात जुगार खेळणे बेकायदेशीर आहे. परंतु, ऑनलाइन गेमिंग उद्योगाशी संबंधित काही लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर खेळले जाणारे गेम जुगारापेक्षा वेगळे आहेत. जुगारात नशिबाला अधिक वाव असतो, तर या गेम्समध्ये लोकांना त्यांच्या डोक्याचा वापर करावा लागतो.