साध्या पद्धतीने लग्न करून सेवाभावी संस्थाना देणगी; पोलीसातील दाम्पत्याचा नवा आदर्श
साध्या पद्धतीने विवाह करून उरलेले पसे सेवाभावी संस्था, लोकोपयोगी प्रकल्पांना देणगी म्हणून देऊन पोलीस दाम्पत्याने राज्य पोलीस दलासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. मनोज पाटील आणि सरिता लायकर-पाटील असे या पोलीस दाम्पत्याचे नाव आहे.
ते दोघे राज्य पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मनोज यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत हुंडा किंवा लग्नातील देण्या-घेण्याच्या व्यवहाराला स्पष्ट शब्दात नकार दिला. दोघांच्या इच्छेने लग्नात आलेल्या निवडक नातेवाईक, मोजक्या मित्र परिवाराला भेटवस्तू म्हणून रोप देण्यात आले.
मनोज सध्या मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तर सरिता सांगली जिल्हयात नेमणुकीस आहेत. मी मुळचा कोल्हापूरच्या पन्हाळयाचा. पश्चिम महाराष्ट्रात थाटामाटात लग्न करण्याची परंपरा आहे. त्यामुळे मुला-मुलीच्या लग्नात येणाऱ्यांचे डोळे दिपून जावे, हाच हेतू ठेवून लाखो रुपये खर्च होताना पाहात आलो. या परंपरेला माझा वैयक्तिक विरोध होता. मला लग्न अत्यंत साधेपणाने करायचे होते. लग्नात खर्च करण्याऐवजी तोच पसा मला प्रामाणिपणे लोकांसाठी, समाजासाठी झटणाऱ्या संस्थांना देणगी म्हणून द्यायचा होता, असे मनोज यांनी सांगितले.
गेल्यावर्षी माझ्या आई-वडिलांनी सरिताचे स्थळ आणले. त्यांच्या (सरिता) घरी पाहाण्याचा कार्यक्रम पार पडला. दोघांनी एकमेकांना पसंत केले. लग्नाची तयारी सुरू झाली. पालकांच्या परवानगीने आम्ही भेटलो आणि मी माझे लग्नाच्या खर्चाबाबतचे विचार तिला सांगितले. सक्ती नाही पण विचार करून कळव, असेही सुचवले. सरिताने एका झटक्यात मला होकार दिल्याचेही मनोज म्हणाले.
प्रत्यक्षात मलाही लग्नातला वायफळ खर्च नको होता. मनोज यांनी माझ्या मनातलेच सांगितले. उलट त्यांनी हुंडय़ालाही विरोध केला. लग्नात एकाही रुपयाचा व्यवहार चालणार नाही, अशी भूमिका घेतली. मला तीन थोरल्या बहिणी.
मराठा समाजात, पश्चिम महाराष्ट्रात हुंडा, देण्याघेण्याचे व्यवहार अजूनही चालतात. माझ्या वडिलांनी खुप कष्टांनी आम्हा भावंडांना मोठे केले, शिकून पायावर उभे केल्याचे सरिता यांनी सांगितले.
समाजोपयोगी निधी
२८ एप्रिलला मनोज-सरिता नरसोबाची वाडी येथे विवाहबद्ध झाले. लग्नविधी उरकताच त्यांनी सर्वप्रथम ‘नाम’ संस्थेला ५० हजार रुपयांची देणगी दिली. मनोज यांचे शिक्षण झालेल्या पन्हाळयाच्या देवळे गावातल्या महाविद्यालयाला ३० हजार, येथील ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या कालवा बांधणीला ३० हजार, देवळेतील प्राथमिक शाळेला २५ हजार, येथील एका मंदिराला १० हजार आणि पाटण्यातील सार्वजनिक वाचलनायाला ५ हजार रुपयांची देणगी या दोघांनी दिली आहे. या दोघांनी कमाईतून प्रत्येकी एकेक लाख रुपये देणगी स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला होता. उर्वरित ५० हजार रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने दान करण्यात येतील, असे या दाम्पत्याने सांगितले. भविष्यातही कोणत्याही विधी, कार्यक्रमांवर वायफळ खर्च न करता तोच पसा समाजोपयोगी कार्याला देणगी स्वरूपात देण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.