जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक देशांनी लॉकडाउनची घोषणा केली असून करोनाचा प्रादुर्भाव अजून वाढणार नाही यासंबंधीत उपाययोजना करताना दिसत आहेत. अशातच जगभरातील वेगवगेळ्या भागांमधून विचित्र पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातही लॉकडाउनदरम्यान उगच भटकणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस आणि त्यांच्या येणाऱ्या चित्रविचित्र अनुभवासंदर्भातील बातम्याही अढळून येत आहेत. भारतामधील वेगवेगळ्या राज्यांमधील पोलीस रस्त्यांवर कारण नसताना भटकणाऱ्यांचा समाचार घेत असतानाच परदेशामध्ये पोलिसांना वेगळ्याच समस्येचा समाना करावा लागत आहे. लॉकडाउनमुळे रस्ते रिकामे असल्याने लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत बाहेर फेरफटक्यासाठी येत वेगाने गाड्या चालणाऱ्यांचे प्रमाण परदेशामध्ये वाढल्याचे चित्र दिसत आहे. असाच एक विचित्र प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये समोर आला आहे.

अनेक देशामध्ये लॉकडाउनदरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये रस्त्यांवरील वाहनांची संख्या खूपच कमी झाली आहे. याचाचा गैरफायदा घेत परदेशातील अनेक शहरांमध्ये तरुण आपल्या महागड्या गाड्या वेगाने चालवताना अढळून येत आहेत. लॉकडाउनदरम्यान वाहतूक पोलीस आपल्याला अडवणार नाही असं या तरुणांना वाटतं. मात्र सिडनीमधील एका व्यक्तीला अतीवेगाने गाडी चालवताना पकडलं तेव्हा त्या तरुणाने सांगितलेलं कारण ऐकून पोलीसच गोंधळले. आपली लॅम्बॉर्गिनी गाडी घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अडवलं. त्यावेळी या तरुणाने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी ‘मला करोना झाला असून मी रुग्णालयामध्ये करोनाची चाचणी करण्यासाठी जात आहे,’ असं कारण सांगितलं. ज्या रस्त्यावर कमाल वेग मर्यादा ही ९० किमी प्रती तास आहे त्या रस्त्यावर हा तरुण १६० किमी प्रती तास वेगाने गाडी चालवत होता.

करोनाची चाचणी करण्यासाठी रुग्णालयामध्ये जायचं असल्यास जवळच्या आरोग्य केंद्राची मदत घ्या असं आवाहन ऑस्ट्रेलियन पोलिसांनी केलं आहे. “कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करुन नये,” असं सहाय्यक पोलीस निरिक्षक असणाऱ्या मिशेल क्रोबॉय यांनी स्पष्ट केलं आहे.

जर तुम्हाला करोनाचा लक्षणं असल्यासारखं वाटतं असले आणि डॉक्टरांची भेट घ्यायची असेल किंवा रुग्णालयामध्ये भरती व्हायचं असेल तर फोन करुन त्यासंदर्भातील माहिती रुग्णालयामध्ये द्या. खूपच आप्तकालीन परिस्थिती असेल तर थेट ट्रीपल झीरो या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करा, असं आवाहन क्रोबॉय यांनी केलं आहे.

करोनाचे कारण देत वेगाने गाडी चालवण्याचे प्रकार जगभरामध्ये घडताना दिसत आहे. कॅनडामधील उत्तर ओकानागण जिल्ह्यातील पोलिसांनी यासंदर्भात इशारा देणारं ट्विटही केलं आहे. “कोवीड-१० हे गाडी ५० किमी प्रती तास वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी चालवण्याचं कारण असू शकत नाही. आपण सर्व सुरक्षित राहूयात. आधीच आपल्या रुग्णालये सध्या कामामध्ये व्यस्त आहेत,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अशाच पद्धतीचे ट्विट आणि आवाहन इतर देशामधील पोलीस खात्यांच्या माध्यमातूनही केले जात आहेत.

करोनासंदर्भातील चाचणीसाठी जवळच्या रुग्णालयामध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये फोन केल्यास रुग्णवाहिकेची सोय केली जाईल असं अनेक शहरामधील पोलिसांनी म्हटलं आहे.

Story img Loader