करोना व्हायरस या महामारीने २०४ देशांत हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत या महामारीनं ७० हजार जणांचा बळी घेतला आहे. तर १३ लाख जणांना याची लागण झाली आहे. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश लढा देत आहे. या लढ्यात आयर्लंडचे पंतप्रधान आणि मराठी वंशाचे डॉ. लिओ वराडकर स्वत: रूग्णांवर उपचार करण्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टर झाले आहे. त्यांच्या या कार्यामुळे जगाचे त्यांनी लक्ष वेधलं आहे.

Irish Timesच्या वृत्तानुसार, आयर्लंडमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्यांच संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आयर्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत असून संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पुन्हा एकदा डॉक्टरांच्या पेशात रजिस्ट्रेशन केलं आहे. वराडकर हे पुढील आठवड्यात कोरोनाग्रस्तांचे उपचार करणार आहेत.

सात वर्ष वराडकर राहिलेत डॉक्टर –
लिओ वराडकर यांनी सात वर्ष डॉक्टर म्हणून कामकाज केलं आहे. राजकारणात येण्याआधी वराडकर डबलिन येथील सेंट जेम्स रुग्णालय आणि कोनोली रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

लिओ वराडकर यांचा राजकीय प्रवास

लिओ यांचे वडील अशोक वराडकर १९६० साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथेच स्थायिक झाले. लिओ यांचं कुटूंब मुळचं सिंधुदूर्गमधल्या वराड गावचं असून त्यांचे चुलते आणि इतर नातेवाईक आजही वराडमध्येच राहतात. लिओ यांची २०१७ साली आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली. २०१७ साली झालेल्या आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत त्यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला होता. वराडकर यांना ७३ पैकी ५१ मते मिळाली होती. वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करणारे लिओ २७ व्या वर्षी पहिल्यांदा संसदेत निवडून गेले. त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. २०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते.

Story img Loader