करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन असल्याने केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत. करोनाची दहशत असतानाही अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्यांचे काम चोख बजावतायेत. काही कर्मचारी कामासोबतच खबरदारी म्हणून नवनवे उपाय देखील करत आहेत. असाच एका बॅंक कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बँकेचा एक कॅशिअर कशाप्रकारे करोनापासून खबरदारी घेतोय, हे दिसून येतंय.

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अधिकृत माहिती नाही, पण गुजरातमधील एका बँकेचा असल्याचं सांगितलं जातंय. व्हायरल व्हिडिओमध्ये बँक कर्मचारी चक्क इस्त्री आणि चिमटा घेऊन बसल्याचं दिसतंय. आपल्या काउंटरवर आलेली प्रत्येक पावती किंवा चेक तो कर्मचारी चिमट्यात पकडतो आणि नंतर टेबलवर ठेवलेली गरम इस्त्री त्यावर फिरवताना दिसत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हायरल व्हिडिओ रिट्विट करताना त्यावर प्रतिक्रिया देत बँक कर्मचाऱ्याचं कौतुक केलंय. ‘कॅशिअर वापरत असलेली पद्धत करोनावर किती परिणामकारक आहे याची कल्पना नाही. पण त्याने जी शक्कल लढवली त्याचं श्रेय त्याला मिळालया पाहिजे’, असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी कर्मचाऱ्याचं कौतुक करत आहेत.

Story img Loader