CoronaVirus Outbreak : करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी मोठी घोषणा केली. जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं अत्याधुनिक साधनं असूनही हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की तयारीच करता येत नाही. त्यामुळे मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
पंतप्रधानांच्या या घोषणेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. क्रिकेट विश्वातील व्यक्तिंनीदेखील हा निर्णयाचे स्वागत केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात पुढील २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मी साऱ्यांना विनंती करतो की करोनामुक्त भारतासाठी आपण सारेच घरातच राहूया”, असे ट्विट भारताचा कर्णधार विराट कोहली याने केले. त्यानंतर हरभजन सिंग चेतेश्वर पुजारा अनिल कुंबळे सचिन तेंडुलकर या आजी माजी क्रिकेटपटूंनीदेखील यास पाठिंबा दिला. आता भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजा यानेही लॉकडाउनचे समर्थन केले आहे.
जाडेजाने एक व्हिडीओ पोस्ट केला. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू चोरटी धाव घ्यायला जातो आणि त्यावेळी जाडेजा स्टंपवर थ्रो मारून त्याला रन आऊट करतो असे दिसत आहे. त्याच व्हिडीओचा आधार घेत त्याने नागरिकांना सल्ला दिला आहे की घराच्या आत राहा, सुरक्षित राहा. रन आऊट अजिबात होऊ नका.
जाडेजाच्या या अनोख्या ढंगातील संदेशाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, करोनाच्या तडाख्यामुळे यंदाच्या वर्षी IPL ची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. २९ मार्चपासून नियोजित असलेली IPL स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तशातच IPL स्पर्धा आता होणार की नाही याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जाडेजादेखील घरीच आहे.