नवरीने परिधान केलेला लग्नातला ड्रेस हा नवऱ्या मुलाच्या पहिल्या पत्नीकडून चोरून आणला असल्याचं उघड झाल्यानंतर नवरा आणि नवरीला त्यांच्या लग्नातच अटक करण्यात आली. नवरी वराच्या पहिल्या पत्नीला वारसाहक्काने मिळालेले काही दागिनेही घातले होते. आपल्या घटस्फोटापासून हे दागिने गायब असल्याचा दावा वराच्या पहिल्या पत्नीने केला आहे. एका मित्राने ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर या महिलेने पोलिसांना माहिती दिली आणि आपला पूर्वाश्रमीचा पती आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीविरोधात तक्रार केली.
वराचं नाव अॅडम असून त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव, जिने पोलिसांना बोलावलं, ती मेरी. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांच्या सहकाऱ्याने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे. मेरी आणि अॅडम एकत्र काम करत होते. त्यांनी एकमेकांसोबत लग्न केलं होतं, बरेच वर्ष संसार करत होते. लग्नानंतर त्यांनी एकत्र एकाच कंपनीत काम करायला सुरूवात केली. मात्र काही कालावधीनंतर मेरीने नोकरी सोडली आणि त्यानंतर अॅडमचे दुसऱ्या बाईशी संबंध असल्याचं मेरीच्या लक्षात आल्याने तिने त्याला घटस्फोट दिला.
या सहकाऱ्याने सांगितलं की, मेरीने कोणत्याही प्रकारचा त्रागा केला नाही, अॅडमला काहीही बोलली देखील नाही. मात्र घटस्फोटानंतर ती जेव्हा घर सोडून जात होती, त्यावेळी तिच्या लक्षात आलं की तिने लग्नात घातलेला ड्रेस आणि काही पारंपरिक दागिने गायब झाले आहे. सुरूवातीला तिला वाटलं की सामान हलवताना ते कुठेतरी ठेवले गेले आहेत आणि त्यानंतर ती ही गोष्ट विसरूनही गेली. काही दिवसांनी अॅडमसोबत काम करणाऱ्या चेल्सीसोबत त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व सहकाऱ्यांनाही लग्नाला बोलवलं. चेल्सी ही तीच बाई जिच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे मेरीने अॅडमला घटस्फोट दिला. मेरीला या लग्नाबद्दल काहीही समस्या नसल्याचं लक्षात आल्यावर सहकाऱ्यानेही या लग्नाला जायचं ठरवलं. त्याने सांगितलं की, अॅडमच्या लग्नात माझ्या लक्षात आलं की चेल्सीने घातलेला ड्रेस हा मेरीने लग्नात घातलेल्या ड्रेससारखाच हुबेहुब आहे. मी त्याक्षणी एक फोटो घेतला आणि तो मेरीला पाठवला आणि विचारलं की हा ड्रेस अगदीच तुझ्या ड्रेससारखा नाही का?
त्यावर मेरीने काहीच उत्तर दिलं नाही. मात्र तासाभराने थेट ती पोलिसांसोबत आली. त्यानंतर पोलिसांनी चेल्सीला ड्रेस आणि दागिने काढून ते मेरीला परत करण्यास सांगितलं. मात्र चेल्सीने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. या वादात अॅडमनेही उडी घेतली. पोलिसांसोबतच्या त्यांच्या उर्मट वागण्यामुळे पोलिसांनी त्या दोघांनाही लग्नातूनच अटक करत ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. तिथे गेल्यावर अॅडमनेच ड्रेस आणि दागिने चोरल्याचं उघड झालं. जामीन मिळाल्यानंतर चेल्सीला ड्रेस आणि दागिने पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे लागले.
या जोडप्याच्या एका सहकाऱ्याने ही घटना रेडीट या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट बरीच व्हायरल होत असून यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. ही घटना कुठे घडली याबद्दल मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही.