Amazon ही प्रतिथयश कंपनी त्यांच्या सेवेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बंगळुरुत राहणाऱ्या एका दाम्पत्याला भीतीदायक अनुभव आला आहे. त्यांनी Amazon चं पार्सल आलं आणि त्यात चक्क जिवंत साप बाहेर आला. हा साप पाहून दाम्पत्याची भीतीने गाळण उडाली आहे. ज्या दाम्पत्याने पार्सल मागवलं होतं ते दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी एक्स बॉक्स कंट्रोलर ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा त्याचा बॉक्स आला तेव्हा त्यात चक्क साप निघाला. कोब्रा या जातीचा हा साप पाहून या दोघांची पाचावर धारण बसली. हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता त्यामुळे सुदैवाने या दोघांना काहीही इजा झाली नाही.
दाम्पत्याने तयार केला व्हिडीओ
या धक्कादायक प्रकारानंतर बंगळुरुतल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर कपलने याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी हे म्हटलं आहे की आम्ही अॅमेझॉनवरुन एक्सबॉक्स कंट्रोलर मागवला होता. त्या बॉक्समध्ये जिवंत साप होता. अॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयने हा बॉक्स आमच्या हातात दिला नाही तर तो आमच्या घराबाहेर हा बॉक्स ठेवून गेला होता. आम्ही बंगळुरुतल्या सराजपूर रोड या ठिकाणी असलेल्या इमारतीत राहतो. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसंच प्रत्यक्षदर्शीही आहेत, ज्यांनी आम्हाला याबाबत सांगितलं असं या दाम्पत्याने व्हिडीओत म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- धक्कादायक! कॉलेज कॅन्टीनच्या जेवणात सापडले सापाचे तुकडे, विद्यार्थ्यांचा दावा; १०ते १५ जण रुग्णालयात दाखल
व्हिडीओत महिलेने काय म्हटलं आहे?
सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने सांगितलं, “सुदैवाने तो साप पॅकिंग टेपमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याने आम्हाला काहीही इजा केली नाही. आम्ही याबाबत कंपनीला म्हणजेच अॅमेझॉनला संपर्क केला. त्यांच्या ग्राहक सेवेच्या अधिकाऱ्यांनी दोन तास तुम्हीच या प्रसंगाशी दोन हात करा असं सांगितलं. त्यामुळे साप असलेला बॉक्स समोर ठेवत त्यावर लक्ष ठेवण्याची वेळ आमच्यावर अर्ध्या रात्री आली. आम्ही जे पैसे दिले होते ते आम्हाला कंपनीने परत दिले आहेत. मात्र विषरी साप आल्याचा जो धोका होता त्याचं काय? साप कुणाला चावला असता तर जीवही जाऊ शकला असता. अॅमेझॉन या कंपनीने सपशेल निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळेच ही घटना घडली आहे. या घटनेसाठी कोण जबाबदार आहे?” असाही प्रश्न या महिलेने विचारलं आहे.
कंपनीने काय उत्तर दिलं आहे?
इंजिनिअर दाम्पत्याने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यावर अॅमेझॉन कंपनीने खेद व्यक्त केला आहे. ग्राहकांना जो त्रास सहन करावा लागला त्यामुळे आम्हाला वाईट वाटलं. आमची टीम लवकरच तुम्हाला याबाबत माहिती देऊ असं कंपनीने म्हटलं आहे.
यानंतर इंजिनिअर दाम्पत्याने म्हटलं आहे की आम्हाला कंपनीने सगळे पैसे परत केले आहेत. मात्र अधिकृतरित्या त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाही किंवा जे काही घडलं त्याची नुकसान भरपाई दिलेली नाही. सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे. भविष्यातही यात काही सुधारणा होईल असं वाटत नाही असंही या दोघांनी म्हटलं आहे.