एका जोडप्याने रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी मागवलेल्या अन्नाचे पैसे परत मिळवण्यासाठी जे कृत्य केले, त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील जोडप्यानं पैसे परत मिळवण्यासाठी जे केले आहे त्यावर नेटकरी फारच नाराज झाले असून, सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी अशा गोष्टींपासून सावधानता बाळगली पाहिजे, हे देखील स्पष्ट होते. हा व्हायरल होणारा व्हिडीओ म्हणजे एका रेस्टॉरंटचे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यामध्ये एक बाई आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीच्या अर्धवट खाल्लेल्या ताटामध्ये आपले केस तोडून टाकताना दिसत आहे. असे केल्याने आपण मागवलेल्या पदार्थात केस आहे हे दाखवून, रेस्टॉरंटकडे त्यांनी मागवलेल्या पदार्थांचे पैसे परत घेण्याचा तिचा हेतू होता असे स्प्ष्ट दिसते. पण, व्हिडीओमधील बाई असे काही करत आहे हे लक्षात येताच, रेस्टॉरंटमधील लोकांनी त्यावर भराभर हालचाल करून, त्या जोडप्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजचा सरळ व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला.
हा व्हिडीओ @The Observatory या फेसबुक हँडलवरून सोशल मीडियावर फिरत होता. त्यांनी “असं काही करायला आम्हाला आवडत नाही, पण या क्षेत्रात आधीच कष्ट असतात, मात्र त्यातून जेव्हा ‘स्वतः मागवलेल्या अन्नपदार्थात, स्वतःचेच केस टाकून जेवणाचे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करणारी लोकं येतात’ तेव्हा सर्वांनाच विनाकारण जास्त त्रास होतो. चला, किमान यातून इतर हॉटेल्स तरी अशा गोष्टींपासून सावध होतील”, अशा कॅप्शनसहित हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा : अरे देवा, रात्रभर पार्टी अन् घरभर पसारा? झटपट घर आणि स्वयंपाकघर आवरण्याच्या या पाच टिप्स पाहा….
जेव्हा या जोडप्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा काही नेटकऱ्यांनी यांना हे असे कृत्य करण्यामागचे जाब विचारले; तर काहींनी त्या रेस्टॉरंटच्या हुशारीचे आणि लोकांना अशा गोष्टींपासून जागरूक केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या व्हिडीओला १७ हजार व्ह्यूज मिळाले असून, त्यावर अनेक प्रतिक्रियादेखील आल्या आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
“असं काही करण्याची त्यांची ही पहिली वेळ नक्कीच नाहीये”, अशी एकाने प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरा म्हणतो, “तुम्ही त्यांच्यावर चांगलाच दंड आकारला असेल आणि त्यांना कायमसाठी तिथे येण्यावर बंदी घातली असणार.” तिसऱ्याने, “यांना सगळं काही फुकट हवं. काय माहीत अशी अजून किती लोकं असतील”, अशी प्रतिक्रिया दिली. चौथ्याने, “हे अतिशय वाईट आहे, पण तुम्ही हा व्हिडीओ शेअर केलात ते चांगलं झालं”, अशी कमेंट केली. तर शेवटी पाचव्या व्यक्तीने, “त्यांनी हे असं का केलं?” असा प्रश्न केला.