सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहिम सिंग यांना गेल्या आठवड्यात बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. १५ वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी बाबा राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हरयाणासह पंजाबमध्ये हिंसाचार झाला होता. यात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला तर २५० हून अधिक जण जखमी झाले होते. यावेळी हरयाणामध्ये उसळलेल्या दंगलीची परिस्थिती भीषण होत चालली होती.
आंदोलकांनी पोलिस स्टेशन, वृत्तवाहिन्यांच्या गाड्या तसेच रस्त्यावरील सामान्य नागरिक यांच्यावर थेट हल्ला चढविला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनीही घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र, त्यावेळी पंचकुलाच्या उपायुक्त गौरी पराशर जोशी यांनी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी त्यांच्यावरही हल्ला झाला आणि त्या काही प्रमाणात जखमी झाल्या, तरीही त्यांनी मोठ्या धाडसाने परिस्थितीचा सामना केला. यावेळी योग्य तो निर्णय घेत त्यांनी त्वरीत लष्करी दलाला पाचारण करण्यास सांगितले.
काही काळाने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ११ महिन्यांच्या बाळाची आई असलेली ही अधिकारी महिला रात्री ३ वाजता घरी परतली. त्यामुळे एका महिला अधिकाऱ्याची आपल्या कामाप्रती असणारी निष्ठा आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शनच यानिमित्ताने घडले. जोशी या २००९ च्या बॅचमधील अधिकारी असून त्यांनी याआधीही अनेक ठिकाणी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. मागील एक वर्षापासून त्या पंचकुला येथे कार्यरत आहेत. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हरयाणात अक्षरश: हैदोस घातला होता. या हिंसाचारासाठी डेरा सच्चा सौदाने भाडोत्री गुंडांचा वापर केल्याचेही समोर आले होते. प्रशासनासावर दबाव टाकण्यासाठी डेरा सच्चा सौदाकडून शक्ती प्रदर्शनदेखील करण्यात आल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते.