देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या दररोजच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. २४ तासांत २,५०३ लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. ही संख्या ६८० दिवसांतील सर्वात कमी आहे. ३ मे २०२० रोजी संसर्गाची २,४८७ प्रकरणे होती. संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या देखील ३६,१६८ वर आली आहे. करोनावर मात मिळवण्यासाठी वेगाने लसीकरण मोहीम सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, देशात १६मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होईल. सध्या देशातील ६० वर्षांवरील सर्व लोकांना करोनावरील बुस्टर डोस दिला जाणार आहे. याआधी हा डोस फक्त या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या लोकांनाच दिला जात होता. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने वैद्यकीय संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर १२-१३ वर्षे आणि १३-१४ वर्षे वयोगटातील (२००८ ते २०१० मध्ये जन्मलेल्या) मुलांसाठी अँटी-करोना लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना हैद्राबाद येथील बायोलॉजिकल ई कंपनीने निर्मित ‘कोर्बेवॅक्स’ या अँटी-करोनाव्हायरस लसीचा डोस दिला जाईल. मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित असल्याचं मांडवीय यांनी ट्विट केलं आहे. मला कळविण्यात आनंद होत आहे की,”१६ मार्चपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होत आहे.” तसेच ६० वर्षांवरील प्रत्येकाने बुस्टर डोस घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं.
Cowin पोर्टलवर अशी नोंदणी करा
- तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर http://www.cowin.gov.in वेबसाइट उघडा.
- आता नोंदणी/साइन इन पर्यायांपैकी एक निवडा.
- त्यानंतर मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून नोंदणी करा.
- जर तुम्ही याआधी नोंदणी केलेला फोन नंबर टाकत असाल तर तुम्हाला Add Member या पर्यायावर क्लिक करून मुलाचे तपशील भरावे लागतील.
- जर तुम्ही नवीन फोन नंबर वापरत असाल तर तुम्हाला Add Member वर क्लिक करून तपशील भरावा लागेल.
- आता तुम्हाला फोटो आयडी पुरावा, फोटो आयडी क्रमांक, नाव, लिंग आणि जन्म वर्ष यासह सर्व आवश्यक तपशील भरावे करावे लागतील आणि नोंदणी बटण दाबावे लागेल.
- यानंतर उपलब्ध तारीख, वेळ स्लॉट आणि लसीकरण केंद्र निवडून खात्री करा.
देशव्यापी अँटी-करोनाव्हायरस लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १८०.१९ कोटी डोस देण्यात आले आहेत. दैनंदिन संसर्ग दर ०.४७ टक्के नोंदविला गेला आणि साप्ताहिक संसर्ग दर ०.४७ वर नोंदविला गेला. या साथीमुळे आतापर्यंत एकूण ५,१५,८७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.