सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काहीना काही उपाय करत असतो. महिलांना सुंदरतेची अधिक भूरळ असल्याचीही दिसून येते. सुंदरतासाठी मग त्या ब्यूटी पार्लर आणि मेकअप यामध्ये बराच वेळ घालवताना दिसतात. यासाठी पुस्तके तसेच टीव्ही कार्यक्रमातून मिळणारी माहिती याचा प्रयोग देखील केला जातो. आयुर्वेदीक औषधांची देखील शोधाशोध होते. निखळ आणि सुंदर चेहऱ्यासाठी औषधांची शोधाशोध करणाऱ्यांसाठी गुजरात गो-सेवा मंडळाने सर्वाधिक जवळ असणारा आणि परवडणारा उपायाची माहिती आपल्या पुस्तिकेतून जारी केली आहे.
गाय तुमचा चेहरा चमकदार करु शकते, असा दावा गुजरातमधील गो-संवर्धन आणि गोसेवा विकास मंडळाने केला आहे. गोमूत्र, गाईचे दुध आणि विष्ठा यातून सुंदरता मिळू शकते असे गोसेवा मंडळाने आपल्या पुस्तिकेतून म्हटले आहे. गुजरात मंडळाने ‘आरोग्य गीता’ या पुस्तिकेच्या माध्यमातून गाय आणि सुंदरतेमध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न केला. या पुस्तिकेमध्ये त्यांनी जगातील सुंदर महिला म्हणून ओळख असणाऱ्या इजिप्तच्या राणीचा उल्लेख देखील केला आहे. इजिप्तची राणी क्लिओपात्रा आपल्या सुंदरतेसाठी गाईच्या दुधाने स्नान करायची असे त्यांनी म्हटले आहे. इटली, रशिया आणि अमेरिकाच्या शास्रज्ञांनी गो- उत्पादनाच्या औषधी गुणांचा अभ्यास केला असल्याचा उल्लेख देखील ‘आरोग्य गीता’ या पुस्तिकेत करण्यात आाला आहे.
‘आरोग्य गीता’ या पुस्तिकेमध्ये ‘गोमूत्र’ या विषयावर स्वतंत्र अध्याय
देण्यात आला असून यातुन सुंदरतेच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांनी सुंदरतेसाठी गाईचे दुध, गोमूत्र आणि तूप कसे लावावे, याबद्दल माहिती मिळते. सर्वप्रथम चेहऱ्यावर दुध लावावे त्यानंतर तूपाने मालिश करुन गोमूत्र लावावे. तसेच गाईची विष्ठा (शेण) देखील लावावी, असे पुस्तिकेत म्हटले आहे. चेहऱ्यावर लेप लावल्यानंतर तो १५ मिनटे चेहऱ्यावर तसाच ठेवावा. असे देखील या पुस्तिकेत नमुद करण्यात आले आहे.