बांग्लादेशसारख्या मुस्लिमबहुल देशात महिलांच्या काम करण्यावर आधीच काही सामाजिक, धार्मिक बंधनं आहेत. त्यातही महिलेने व्यवसाय करायचा म्हटलं की अनेकांच्या पुरूषप्रधान भुवया उंचावतात. पण बांग्लादेशमधलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर चितगावमध्ये जर लाऊडस्पीकरवर ढणाढण म्युझिक लावलेली एखादी सायकल रिक्षा नजरेला पडली तर हमखास समजावं ती ‘क्रेझी आंटी’ची सायकलरिक्षा आहे. अख्ख्या बांगलादेशमधली ही एकमेव महिला सायकल रिक्षाचालक आहे.
क्रेझी आंटी खरोखरची क्रेझी नाही. मुसम्मत जॅस्मिन असं या आंटीचं खरं नाव आहे. मुसम्मत आणि तिच्या तीन लहान मुलांना सोडून दुसऱ्या बाईसोबत पळून गेलेल्या तिच्या पतीच्या वाटेकडे नजर लावून बसण्यापेक्षा मुसम्मत आंटीने धडाडीने संसाराची सूत्रं हातात घेतली. सुरूवातीला मोलकरीण म्हणून तर नंतर एका कापडगिरणीत तिने नोकरी पकडली. पण या दोन्ही नोकऱ्यांमधून पुरेसे पैसे मिळत नसल्याने मुसम्मतने तिच्या शेजाऱ्याची सायकल रिक्षा काही दिवस भाड्याने घेतली. आणि या शारिरीक कष्टाच्या पण चांगली मिळकत देणाऱ्या धंद्यात चांगलाच जम बसवला.
वाचा- ‘उबर’चे ग्राहकांसाठी ‘फ्लाईंग टॅक्सी’ आणण्याचे बेत
अपेक्षेप्रमाणे ‘हे महिलांचं काम नव्हे’, ‘तू पुरूषांच्या वाटच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेस’,’तू तर बाई आहेस तुला तर या कामाचे कमी पैसे घ्यावे लागतील’ वगैरे टोमणे आणि अपमान सहन करत करत मुसम्मतने नेटाने आपला व्यवसाय सुरू ठेवला. आपल्या बुरसटलेल्या विचारांनी तिचा अपमान करणाऱ्यांपेक्षा आपल्या तिघा मुलांच्या शिक्षणाची तिला जास्त चिंता होती.
आठवड्याचे सातही दिवस काम करत प्रत्येक दिवशी भारतीय चलनाप्रमाणे साधारण ५०० रूपये कमावणाऱ्या मुसम्मत आंटीची बरीचशी मिळकत सायकलरिक्षाच्या भाड्यापोटीच खर्च होते. पण ती जिद्दीने हा व्यवसाय पुढे नेत आहे. तिचा नेट पाहून आधी तिच्यावर टीका करणारी तोंडं आता गपगुमान तिच्या मेहनतीची प्रशंसा करताना दिसतात.
महिलांनी काम करणं हे इस्लामच्या विरूध्द आहे असं म्हणणारेच आता मुसम्मत आंटीच्या बाजूने बोलायला लागले आहेत. पैशांची भ्रांत पडलेल्या महिला वेश्याव्यवसाय किंवा अंमली पदार्थांच्या विक्रीकडे वळतात, तेव्हा मुसम्मत जॅस्मिनची व्यवसाय करण्याची धडाडी इतर मुस्लीम महिलांपुढे चांगला आदर्श घालून देते आहे असं चितगावमधल्या मशिदीतले मुख्य इमाम आता कबूल करतात.
जमाना झुकता है झुकानेवाला चाहिये हेच खरं!