‘ज्या बायका बॅकलेस ब्लाऊज घालतात त्या मला खूप आवडतात’ किती चीड आणणारं हे वाक्य आहे. एखादा माणूस किती विकृत असू शकतो किंवा त्याची वैचारिक पातळी किती खालच्या थराला जाऊ शकते, हे दाखवून देणारं हे वाक्य लिहिलं आहे ते ‘v8nair’ या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या प्रोफाईलवर.
महिलांविषयी अत्यंत विकृत विचार असणाऱ्या या अकाऊंटवरून बॅकलेस ब्लाऊज घातलेल्या महिलांचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. त्यातल्या अनेकींना तर आपल्यासोबत असा काही प्रकार घडतोय याची कल्पनादेखील नाही. हा माणूस महिलांच्या पाठीला विचित्र पद्धतीने स्पर्श करतो आणि त्याचे व्हिडिओ आपल्या अकाऊंटवर शेअर करतो. चीड आणणारी ही विकृत कृती करणाऱ्या व्यक्तीचं नाव विनय नायर असल्याचं समजते.
दुर्दैव म्हणजे त्याच्या अनेक व्हिडिओंवर आक्षेप घेण्यापेक्षा काहींनी त्याला फॉलोही केले आहे. या व्यक्तीला इन्स्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या थोडीथोडकी नाही तर तब्बल दीड हजारांहून अधिक आहे.
२५ मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ‘या’ १२ वर्षांच्या मुलाविषयी वाचलंच पाहिजे
अंगद गुम्माराजू नावाच्या फेसबुक युजरने विनयच्या विकृतपणाचा चेहरा उघड केला. अंगद इन्स्टाग्रामवर काही ब्लाऊजच्या डिझाईन शोधत होता त्यावेळी ‘v8nair’ या अकाऊंटवर त्याला हे धक्कादायक व्हिडिओ दिसले. आतापर्यंत या व्यक्तीच्या अकाऊंटवरून ६० हून अधिक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. ‘अशाप्रकारे अकाऊंट अस्तित्त्वात आहे हे पाहूनच मलाच धक्का बसला. हा माणूस महिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या पाठीला स्पर्श करतो, हे पाहून माझ्या अंगावर तर अक्षरश: काटा आला. या अकाऊंटवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी’ अशी पोस्ट अंगदने शेअर केली आहे.
Viral : अहो गर्लफ्रेंड नव्हे, ‘ती’ माझी आई आहे!
महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी जगभरात ‘Metoo’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हा विषय किती गंभीर आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी प्रभावीपणे #Metoo सारखी मोहिम राबवली जात आहे. जगभरातल्या लाखो महिला ज्या यापूर्वी कधीच खुलेपणाने व्यक्त झाल्या नव्हत्या, त्याही आता व्यक्त होत आहेत. पण विनयसारखी विकृत माणसं आणि त्याला फॉलो करणारे लोक जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत महिलांवर होणारे अत्याचार थांबणार नाही हेही तितकेच खरे.