दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या निसर्गरम्य किना-यावर एक विचित्र वस्तू वाहून आली. ही वस्तू काय आहे याचे कोडे अनेकांना उलगडले नाही. त्यामुळे काहीजण धीर एकवटून या विचित्र वस्तूजवळ पोहचले. पण ही वस्तू नेहमीपेक्षा फारच विचित्र आणि भयावह होती. या वस्तूवर असलेले असंख्य जीव आपल्या कवचातून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. हे पाहून नागरिकांना इतका घाम फुटला की जणू एलियनच किना-यावर आले आहेत असे वाटून लोकांनी आरडाओरडा केला आणि इतरांनाही घाबरून सोडले.

वाचा :  राहुल गांधींच्या आरोपानंतर ट्विटरवर ‘#थरथर_मोदी’ हॅशटॅग ट्रेंडमध्ये

न्यूझीलंडच्या मुरीवाई किना-यावर दोन दिवसांपूर्वी एक विचित्र दिसणारी वस्तू वाहून आली होती. वस्तूवर असंख्य जीव आपल्या कवचातून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. असे जीव आतापर्यंत कोणीच पाहिले नव्हते. अवाढव्य आकाराच्या वस्तूंवर चिकटलेले जीव लांबून फारच विचित्र दिसत होते. ज्यांनी ही किना-यावर आलेली वस्तू पाहिली त्यांचा चांगलाच थरकाप उडाला. या दोन दिवसांत मुरीवाईच्या किना-यावर एलियनने आक्रमण केले आहे अशा अफवांना देखील पेव फुटले. ही अज्ञात वस्तू ‘मुरीवाईचे भूत’ या नावाने प्रसिद्ध झाली. पण, नंतर मात्र ही वस्तू म्हणजे भूत किंवा एलियन नसून समुद्रात राहणारे जीव असल्याचे लक्षात आले. खोल समुद्रात ‘गूस बर्नकल’ हे संधिपाद जीव आढळतात. खेकडा, कोलंबी, शिंपले या प्रजातीतले हे सागरी जलचर आहेत. हे जलचर समुद्रातील दगड, जहाजांचे सांगाडे किंवा वस्तूला चिटकून राहतात. वाहून आलेली ही वस्तू जहाजाचा एखादा तुकडा असून त्याला हजारो बर्नकल चिटकून राहिले असतील असे सांगण्यात आले. हा तुकडा समुद्रातून वाहून किना-यावर आला असेल. तेव्हा घाबरुन जाण्याची गरज नाही असे लोकांना आवाहन करण्यात आले. तेव्हा कुठे लोकांना हायसे वाटले.

काही दिवसांपूर्वी केरळमध्येही असचा काहीसा प्रकार घडला. ‘कर्नाटक- केरळ सीमेवर एका एलियनला पिंज-यात कैद केले असून त्याचे उर्वरित चार साथीदार एलियन्स फरार आहेत. त्यामुळे, गावक-यांनी सावध रहा’ असा व्हॉट्स अॅप संदेश या सीमेवर असणा-या गावांत फिरत होता. त्यामुळे गावकरी चांगलेच घाबरून गेले. इतकेच नाही तर हा एलियन जंगलातील प्राण्यांना तर खातोच पण माणसांना पण खातो अशा अफवांना देखील पेव फुटले होते. मात्र सत्य काही वेगळेच होते. गेल्यावर्षीच मलेशियातील एका गावात पकडलेल्या अस्वलाचा हा फोटा होता. एका रोगामुळे त्याच्या अंगावरील केस झडले होते. त्यामुळे तो विद्रुप दिसत होता.

Story img Loader