क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच भारतात गल्लोगल्ली क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जातात. याच स्पर्धांमध्ये अनेक मजेदार प्रसंग घडतात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटवर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये दोन स्थानिक संघांमधील क्रिकेट सामन्याची काँमेंन्ट्री चक्क मावणी भाषेत केली आहे.
या व्हिडिओमध्ये फलंदाज षटकार मारायला जाण्याच्या नादात उंच चेंडू मारून झेल बाद होताना दिसतोय. मात्र त्यापेक्षाही अधिक रंजक या सर्व प्रसंगाची मालवणीमध्ये केलेले कॉमेंन्ट्री आहे. उंच हवेत गेलेला झेल जितू नावाच्या खेळाडूने अचूक पकडल्यानंतर कॉमेंन्ट्री करणाऱ्याने केलेल्या या क्षणाचे वर्णन खूपच अफलातून असून यामुळेच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘मोठो फटकोओओ… चेंडू हवेत जितू चेंडूच्या खाली आणि जितूच्या वयात येऊन चेंडू पडलो. उघडलेल्या तिरफळात जसो दाणो तयार होता.. सवासणीच्या घोट्येत जसा नारळ भरलो जाता… जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता… तसा अतुलने दिल्यान् अन् हे आमंत्रण जितूने घेतल्यान्. दुसरा कलम लागला राहुलच्या नावाचा. अन् हसत हसत राहुल तंबूच्या दिशेने परतताना,’ अशी भन्नाट कॉमेंन्ट्री या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. इतक्यावरच न थांबता या कॉमेंटेटरने बाद झालेल्या राहुल नावाच्या फलंदाजाची खास मालवणी भाषेत खिल्लीही उडवली आहे. एखाद्याने झोपेतून उठूनही चौकार मारला असता इतक्या साध्या चेंडूवर फलंदाज बाद झाला आहे असा टोला कॉमेंटेटरने लगावला आहे. ‘राहुल अशा बॉलवर तू आऊट झालसं ज्या बॉलवर झोपेतून उठाणंसुद्धा कोणी चौकार मारलो असतो. पण त्या बॉलवरसुद्धा तू आऊट. म्हणजे असा म्हटला जाता जर हे वाईट असा तर झाडावर चढलेल्या माणसाला पण येऊन कुत्रो चावता,’ अशी तुलाना या कॉमेंटेटरने केली आहे. तुम्हीच ऐका ही भन्नाट कॉमेंन्ट्री…
त्या मायझया मांजरेकराक सांगा, यांच्याकडून काहीतरी शिक मेल्या.
ह्याका म्हणतत कॉमेंटरी #म #मालवणी#मराठी pic.twitter.com/CqB4i3QRvy— (@malvnimumbaikar) May 10, 2019
हा क्रिकेट सामना कुठे रंगला होता आणि कोणत्या संघांमध्ये तो सुरु होता याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी अनेकांना ही मालवणी कॉमेंन्ट्री भलतीच आवडली आहे. काही तासांमध्ये या व्हिडिओला बाराशेहून अधिक व्ह्यूज ट्विटवर मिळाले आहेत.