सध्या इंडियन प्रिमिअर लिगमध्ये अनेक भारतीय खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकले असून मैदानामधील चुरस पाहण्याची संधी चाहत्यांनाही मिळत आहे. मात्र एकीकडे मुंबई आणि पुण्यातील मैदानांवर हे सामने रंगले असताना दुसरीकडे ट्विटवरही नुकताच एक सामना चाहत्यांना पहायला मिळालं. झालं असं की भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने ट्विटवरुन देशासंदर्भात एक पोस्ट केली. या पोस्टचा संबंध अनेकांनी उत्तर दिल्ली महापालिकेने जहांगीरपुरीत केलेल्या बुलडोझर कारवाईशी आणि देशात सुरु असणाऱ्या धार्मिक तणावाशी जोडला. मात्र इरफानने अर्ध्यात सोडून दिलेल्या या ट्विटच्या पुढे आणखीन एक ओळ लिहीत फिरकीपटू अमित मिश्राने अप्रत्यक्षपणे इरफानला टोला लगावला.
झालं असं की इरफान पठाणने २२ मार्च रोजी सकाळी सव्वा पाचच्या सुमारास एक सूचक अर्थाने ट्विट केलं. यामध्ये त्याने वाक्य अर्ध्यात सोडून दिलं होतं. “माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील (जगातील) सर्वोत्तम देश होण्याची क्षमता माझ्या देशात आहे पण…”, असं इरफानने म्हटलं होतं.
इरफानच्या या ट्विटखाली अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या. बहुतेक सर्वांनीच जहांगीरपुरीमधील कारवाईशी आणि धार्मिक विषयांवरुन निर्माण झालेल्या तणावासोबत या ट्विटला अर्थ जोडला. अनेकांनी व्हिडीओ, फोटो आणि जुने संदर्भ देत इरफानची पाठराखण केली किंवा त्याच्यावर टीका केली.
इरफानचं हे ट्विट चर्चेत असतानाच जवळजवळ सहा तासांनी याच ट्विटप्रमाणे सुरुवात करत अमित मिश्राने एक ट्विट केलं. त्याने इरफानने अर्ध सोडलेलं ट्विट पूर्ण केलं. “माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील (जगातील) सर्वोत्तम देश होण्याची क्षमता माझ्या देशात आहे, पण तेव्हाच जेव्हा काही लोकांना हे समजेल की आपलं संविधान हे सर्वोच्च स्थानी आहे,” असं अमित मिश्राने ट्विटमध्ये म्हटलं.
अनेकांनी हे अमित मिश्राने इरफान पठाणला उत्तर दिल्याचा दावा केलाय. तर काहींनी हे ट्विट दोन्ही बाजूच्या लोकांसाठी असल्याचं म्हटलंय.