सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं जगातील सर्वात महागडी ‘बुगाटी’ कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल १.१ कोटी युरो (भारतीय चलनानुसार 86 कोटीं) एवढी आहे. बुगाटी कंपनीने गाडीच्या मालकाचे नाव सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. मात्र स्पेनिश स्पोर्ट्स डेली मार्काच्या वृत्तानुसार, जगातील सर्वात महागडी कार बुगाटी ‘ला व्हॉयटूर नोएरी’ रोनाल्डोनं खरेदी केली आहे.
या गाडीचा प्रत्येक भाग हा हाताने बनवण्यात आला असून मशीन्सचा कमीत कमी वापर करण्यात आला आहे. कार्बन फायबर बॉडीमुळे या गाडीला चकाकी असणारा काळा रंग शोभून दिसतो. ला व्हॉयटूर नोएरी’ या आलिशान स्पोर्ट्स कारमध्ये ८ लिटरचे १६ सिलेंडर असणारे इंजिन आहे. गाडीमध्ये १ हजार ४७९.४७ बीएचपीची आणि १ हजार ६०० एनएम टॉर्कची शक्ती या कारमध्ये आहे. ही कार ताशी 260 मैल वेगाने धावू शकते.
‘बुगाटी’ या फ्रेंच लक्झरी कंपनीने ११० व्या वर्धापनदिना निमित्त ही सुपरकार तयार केली. ही कार चालवण्यासाठी रोनाल्डोला २०२१ पर्यंत वाट पाहावी लागेल. रोनाल्डोकडे सध्या मर्सिडीज, रोल्स रॉईस, फरारी, लॅम्बॉर्गिनी, अॅस्टन मार्टिन आणि बेंटली अशा सर्वच टॉप कंपन्यांच्या कार आहेत.
अशाप्रकारे बुगाटीने याआधी केवळ दोनदा खास गाड्यांचे मॉडेल तयार केले होते. १९३६ आणि १९३८ दरम्यान अशा पद्धतीने तीन खास गाड्या बनवण्यात आल्या होत्या.