जंगलाचा एक नियम आहे तो म्हणजे ‘बळी तो कान पिळी’. जो बलवान तोच या जंगलात जिवंत राहू शकतो, त्यामुळे जगण्यासाठी येथे रोजच संघर्ष करावा लागतो. कोणीतरी कोणाची शिकार करणार किंवा एखादा दुबळा असेल तर त्याची शिकार होणार, हे इथले साधे गणित. पण लढत जर जंगलातल्या दोन शक्तीशाली प्राण्यांमध्ये असेल तर मात्र त्यात कोणाची सरशी होते हे पाहणं फारच रोमांचकारी असतं. मालवीच्या जंगलातही दोन ताकदवान प्राण्यांमध्ये अशीच रोमांचकारक लढत पाहायला मिळाली.
पाणी पिण्यासाठी हत्तींचा कळप नदीकाठी गेला होता, या कळपात हत्तीचे लहान पिल्लू देखील होते तर नदीत मगर हत्तीची शिकार करण्यासाठी दबा धरून बसली होती. ज्यावेळी हत्तीच्या पिल्लाने पाणी पिण्यासाठी आपली सोंड पाण्याजवळ नेली त्याचक्षणी मगरीने हल्ला करून आपल्या जबड्यात या पिल्लाची सोंड घट्ट पकडून धरली आणि त्याला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. पण या पिल्लानेही शेवटपर्यंत हार मानली नाही. शेवटी जंगलाचा राजा नसला तरी तोही ताकदवानच प्राणी ना! त्याने शेवटपर्यंत मगरीशी लढा देऊन तिच्या जबड्यातून आपली सोंड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, कळपातले इतर हत्तीही त्याच्या मदतीसाठी धावून आले. शेवटी या पिल्लाने मगरमिठीतून आपली सुटका करून घेतलीच.
वाचा : स्वत:चा जीव गमावत त्याने मालकिणीचा जीव वाचवला
एका प्राण्याची आपली भूक भागवण्याची लढाई तर दुस-याची आपलं जंगलातलं अस्तित्व टिकवण्याची लढाई.. अखेर या लढाईत जीत झाली या पिल्लाची. जंगल सफारीला आलेल्या एका डॉक्टरांनी ही लढाई आपल्या कॅमेरात कैद केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.