परदेशी डान्सर्सचे डान्स शो अनेक भारतीयांसाठी नेहमी एक आकर्षणाचा विषय असतो. अशाचप्रकारे उत्तर प्रदेशातील झांशी मौरानीपूरमध्ये प्रांतीय जत्रा जलबिहार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे डान्ससाठी विदेशी डान्सरना आमंत्रित करण्यात आले होतो. परंतु, या कार्यक्रमात प्रचंड गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विदेशी डान्सर्सचा डान्स पाहण्यासाठी आलेली गर्दी इतकी नियंत्रणाबाहेर गेली की, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जलबिहार महोत्सवातील स्वीट नाईट कार्यक्रमात रशियन डान्सरला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी स्टेजवर रशियन डान्सरना पाहून गर्दीतील लोकही नाचू लागले. यानंतर जमाव अनियंत्रित झाला आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि बाऊन्सर्सनी लाठीचार्ज केला, त्यामुळे आणखी चेंगराचेंगरी झाली. या लाठीचार्जमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांकडून बेछूट लाठीचार्ज
स्वीट नाईट कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असताना पोलिस तेथे उपस्थित होते. लोक शांतपणे बसून नृत्य पाहत होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असले तरी अचानक पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
पोलिसांनी केला खुलासा
या कार्यक्रमाला सुमारे १५ ते २० हजार लोक उपस्थित होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यादरम्यान बॅरिकेडिंग तुटून लोक एकमेकांवर पडले. यानंतर लोक आपापसात भांडू लागले. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले. यानंतर कार्यक्रम सुखरूप पार पडला.
या कार्यक्रमात डान्सर आणि सिंगर्सना आमंत्रित करण्यात आले होते, त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. यादरम्यान चेंगराचेंगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रशियन तरुणीच्या डान्सचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.