BJP Demands Arrest VK Pandian, YouTuber Kamiya Jani: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व कर्ली टेल्सची संस्थापक कामिया जानी हिचा जगन्नाथ मंदिर परिसरातील फोटो सध्या चर्चेत आहे. व्हीके पांडियन यांच्याशी चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या फोटोची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ओडिशा युनिटने या फोटोवर आक्षेप नोंदवत कामिया जानी व पांडियन दोघांनाही अटक करण्यात येऊ व पुरीमधील पवित्र मंदिरात पुन्हा प्रवेश दिला जाऊ नये अशी पोस्ट केली आहे. कामिया विषयी बोलताना या पोस्टमध्ये “गोमांस सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी ती ओळखली जाते” असे म्हणण्यात आले आहे आणि त्यावरूनच बीजेपीच्या ओडिशा गटाने आक्षेप घेतला आहे.
वादग्रस्त व्हिडिओमध्ये कामिया जानी पुरी श्रीमंदिर हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाचा प्रचार करताना आणि बीजेडी नेते पांडियन यांच्यासह महाप्रसाद घेताना दिसत आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, ओडिशा भाजपने म्हटले की या घटनेने लाखो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मंदिर परिसरातून व्हिडिओ प्रसारित करणे अस्वीकार्य आहे.
तात्काळ कारवाईचे आवाहन करून, भाजपने पांडियन आणि जानी यांच्या विरोधात आयपीसी कलम २९५ ए अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे आणि त्यांना त्वरीत अटक करण्याची विनंती केली आहे. “ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा असलेल्या पुरी श्रीमंदिराच्या पावित्र्याची, 5T चे चेअरमन व्ही के पांडियन यांनी लज्जास्पद अवहेलना केली आहे, ज्यांनी एका गोमांस समर्थकाला जगन्नाथ मंदिराच्या पूजनीय आवारात जाण्याची परवानगी दिली,” असे ओडिशा भाजपने आपल्या अधिकृत X वर लिहिले आहे. यासाठी त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
भाजपने कामिया जानीच्या जुन्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे जिथे ती “बीफ डिश” चा प्रचार करताना दिसत आहे. या वादानंतर कामिया जानी यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. जानी हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, तिने कधीही गोमांस खाल्ले नाही.
हे ही वाचा<< जिवंत पतीला पत्नीस विधवेसारखं पाहावं लागणं हे क्रूरच! घटस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय काय?
कामिया जानीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “एक भारतीय म्हणून, भारतीय संस्कृती आणि वारसा जगासमोर नेणे हे माझे ध्येय आहे. मी भारतातील सर्व ज्योतिर्लिंगांना आणि चार धामांना भेट दिली आहे आणि हा किती मोठा बहुमान आहे, हे माहीत आहे. जगन्नाथाच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा विचित्र लेख वाचून माझा आजचा दिवस सुरु झाला. मी हे स्पष्ट करू इच्छिते अद्याप मला कोणी यावरून प्रश्न केलेला नाही पण मी गोमांस खात नाही आणि कधीच खाल्ले नाही हे स्वतः स्पष्ट करण्यासाठी ही पोस्ट लिहीत आहे. जय जगन्नाथ.”