काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयांच्या चलनी नोटा बंद करण्यात आल्या आहेत. ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्यानंतर सध्या देशभरात नोटा बदली करुन घेण्यासाठी बँकेसमोर नागरिकांनी रांगा लावतानाचे चित्र दिसत आहे. काळा पैसा आणि चलनी नोटांमधील अफरातफरी रोखण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यानंतर देशात सर्वत्र नोटांची चर्चा सुरु आहे. जुन्या नोटांच्या बदल्यात बॅंक आणि पोस्ट कार्यालयातून नव्या नोटा मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. लांबच लांब रांगामुळे जुन्या नोटा बदली करत असताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्या कष्टाच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी नागरिक बँक आणि पोस्ट कार्यालयामध्ये गर्दीचा सामना करत आहेत.
अचानकपणे सरकारने जारी केलेल्या या निर्णयामुळे नोटा बदली करुन घेण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. काळ्या पैशाच्या सर्जिकल स्ट्राईकवर सोशल मिडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांचे हाल पाहून चलनातील हद्दपार झालेल्या नोटा शंभराच्या चलनात बदलणाऱ्या काल्पनिक मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चलनातून हद्दपार झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचे १०० रुपयांच्या नोटात परिवर्तन होताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. बँक आणि पोस्ट कार्यालयाच्या रांगेत उभे न राहता मशिनच्या माध्यमातून नोटांचे सहज परिवर्तन करणारा कल्पनेतील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे.
यापूर्वी काळा पैसा कसा काय मार्गी लावता येणार याचा विचार करत असणाऱ्या भ्रष्टाचा-यांची फिरकी सोशल मीडियावर घेतली गेली आहे. काळ्या पैशाचे पांढरे पैशात रुपांतर करण्याची फिरकी घेतल्यानंतर सध्या हद्दपार झालेल्या चलनी नोटा परिवर्तीत करणाऱ्या मशिनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.