तंत्रज्ञानात वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे सायबर गुन्हेगार सामान्य माणसांना लुटण्याच्या नवनवीन क्लृप्त्या शोधून काढताना दिसत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वैयक्तिक माहिती चोरणे आणि त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सायबर गुन्हेगारांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याची अनेक प्रकरण तुम्ही याआधी पाहिली असतील. पण सध्या एका पोलिसाचीच सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बांदा येथील सायबर गुन्हेगारांनी एका पोलिसाची ८२ हजारांची फसवणूक केली आहे. शिवाय फसवणूक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगारांनी त्याला फोन केला आणि त्याच्या मुलाने एका स्पर्धेत सफारी कार जिंकल्यांचं सांगितलं. त्यानंतर गुन्हेगारांनी पोलीस कर्मचाऱ्याला आधार कार्ड आणि बँक तपशील पाठवायला सांगितले जेणेकरुन त्यांना ती कार त्यांच्याकडे पाठवता येईल.
हेही पाहा- VIDEO: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान जोरदार भांडण, तरुणाचा महिला पोलिसाला चापट मारण्याचा प्रयत्न
दरम्यान, पोलिसाने सायबर गुन्हेगारांना सर्व माहिती पाठवताच त्यांनी पोलिसाच्या खात्यातून ८२ हजार रुपये काढून घेतले. पोलिस कर्मचाऱ्याला अकाऊंटमधील पैसे काढल्याचा मेसेज येताच त्याला धक्का बसला आणि त्याने लगेच आपले खाते बंद करून घेतले आणि थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यानंतर एसपी अंकुर अग्रवाल यांनी या प्रकरणावर तात्काळ कारवाई करत झारखंडमधील रहिवासी असलेल्या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय अशी फसवणूक झाल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.