पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर पाणी साचलं की त्यामधून चालणंही मुश्लीक होऊन जातं. काही ठिकाणी गटाराचं सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याचं पहायला मिळतं, तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र दिसून येतं. अशावेळेस रस्त्याने चालताना एक एक पाऊल सावधपणे टाकावं लागतं अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होतो. त्यातच कपडे खराब होण्याचीही शक्यता असल्याने फारच जपून यामधून वाटचाल करण्याची कसरत करावी लागते. मात्र पाणी साचलेल्या रस्त्यावरुन सायकल घेऊन जाताना एका व्यक्तीने केलेली भन्नाट कृती सध्या इंटरनेटवर व्हायरल झालीय. त्याची कसरत पाहून अनेकांनी या सायकलस्वाराला देशी स्पायडर मॅन म्हटलंय. तर काहींनी पावसाळ्याआधीचा हा सराव असल्याचा जावईशोध लावलाय.
अॅक्शनपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे हा देशी स्पायडर मॅन चक्क भिंतीवर चढतो. केवळ कपडे आणि पाय भिजू नये म्हणून या व्यक्तीने केलेला हा कारमाना सध्या चर्चेचा विषय ठरतोय. पाण्यामधून सायकल नेताना सायकलचं हॅण्डल पकडून ही व्यक्ती त्याच्या आधारे बाजूच्या घरावरील भिंतीवरुन चालल्यासारखी पाणी साचलेल्या भागातून जाताने दिसते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी त्यावरुन या व्यक्तीला ट्रोल केलंय तर काहींनी याचं डोकं किती सुपीक आहे असा खोचक टोला लागावलाय.
पवासाचं पाणी साचलेल्या रोडवरुन जाणाऱ्या या व्यक्तीकडे एक सायकल आहे. मात्र एवढ्या पाण्यातून जाताना कपडे खराब होतील आणि रस्त्याचा अंदाज न आल्यास आपण सायकलसहीत पाण्यात पडू या विचाराने या व्यक्तीने सायकलचा आधार घेत बाजूच्या घराच्या भिंतीचा आधार घेतला. विशेष म्हणजे ही पाण्यापासून वाचण्याची मोहिम त्याने अगदी यशस्वीपणे फत्ते केली. अनेकदा तोल जाऊन हा पडेल की काय असं हा व्हिडीओ पाहताना वाटतं मात्र तसं काही होत नाही आणि ही व्यक्ती व्यवस्थित त्या पाण्यामधून मार्ग काढत दुसऱ्या बाजूला पोहोचते.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ नॅचरललाइफ ओके या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज आहे. ३५ हजारांहून अधिक जणांनी त्याला लाइक केलंय.