मिचॉन्ग चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे आणि त्याचे परिणाम उत्तर भारतातही दिसून येत आहेत. दक्षिणेकडील अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चेन्नईसह अनेक शहरांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. चेन्नईत एवढा पाऊस पडला की, गाड्या अक्षरश: पाण्यावर तरंगताना दिसल्या. रहिवासी भागातील अनेक घरे पावसाच्या पाण्यात बुडाली आहे; तर रस्त्यावर मगरींचा मुक्त वावर दिसून आला आहे.
शहरात पावसाचा गेल्या ८० वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. दरम्यान, चेन्नईतील पूर परिस्थितीत रविवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावर एक महाकाय मगर फिरताना दिसली. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक मगर रहिवासी भागात फिरत असल्याचे दिसून येत आहे. पुराच्या पाण्यात वाहून ही मगर रस्त्यावर आल्याचे म्हटले जात आहे. यावेळी एक दुचाकीस्वार मगरीच्या जवळून प्रवास करताना दिसत आहे. चेन्नईच्या पेरुंगलाथूर भागात ही मगर दिसून आली. सोशल मीडियावर लोक म्हणतायत की, मुसळधार पावसामुळे त्यांना अनेक भागांत मासे, साप व मगरी दिसल्या आहेत.
दरम्यान, तमिळनाडूच्या अतिरिक्त मुख्य सचिव (पर्यावरण हवामान बदल आणि वन, आयएएस अधिकारी) सुप्रिया साहू यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट करीत, लोकांना घाबरू नका, असे आवाहन केले आहे. तसेच वन विभागाला या घटनेबाबत माहिती दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मगरीच्या घटनेवर लोकांना जागरूक करत त्यांनी लिहिले की, हा प्राणी दिसायला खतरनाक असला तरी फार लाजाळू असतो. तो मानवी संपर्क टाळतो; पण #CycloneMichuang च्या प्रभावामुळे मुसळधार पावसामुळे नदी, तलाव, समुद्रातील पाणी ओसंडून वाहू लागल्याने हा प्राणी बाहेर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणथळ ठिकाणी जाऊ नये. हे प्राणी एकटे राहिल्यास ते मानवाला इजा करू शकत नाहीत.
अंदाजानुसार मिचॉंग चक्रीवादळ चेन्नईच्या पूर्व-ईशान्य ११० किमी अंतरावर उत्तर तमिळनाडू किनारपट्टीवर धडकले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे शहरात मुसळधार पाऊस पडत असून, ठिकठिकाणी पाणी साठले आहे. या मुसळधार पावसाचा परिणाम शहर आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीवर झाला.