Dahi Handi 2024 Celebration Mumbai: आज २६ऑगस्ट रोजी देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. या दिवशी रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा केली जाते. भक्तिमय वातावरणात भगवान श्रीकृष्णाची पूजा, आरती अन् प्रसाद असा साग्रसंगीत कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्वत्र दहीहंडीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येते. मुंबईत जागोजागी उंचच उंच दहीहंड्या लावल्या जातात. अशा या स्पर्धायुक्त वातावरणात दहीहंड्या फोडायला ठिकठिकाणाहून अनेक पथके येतात आणि विक्रम करून जातात.
‘गोविंदा आला रे आला’च्या जल्लोषात हे बाळगोपाळ अगदी काही वेळातच थर लावून एका झटक्यात मटकी फोडतात. यंदा २७ ऑगस्ट रोजी हा दहीकाल्याचा हा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. हा उत्सव अनुभवण्यासाठी तुम्ही मुंबईकर या भव्य दहीहंडी मंडळांना भेट देऊ शकता…
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (G.S.B.) मंडळ, किंग्ज सर्कल
किंग्स सर्कल येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (जीएसबी) हे मुंबईतील सर्वांत जुने लोकप्रिय मंडळ म्हणून ओळखले जाते. हे मंडळ गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव हे दोन्ही उत्सव भव्य प्रमाणात साजरे करते. जीएसबी मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येऊन गर्दी करतात. या ठिकाणी तुम्ही नक्की भेट देऊन दहीहंडीच्या उत्सवाचा आनंद घेऊ शकता.
जय जवान मित्र मंडळ
जय जवान मित्र मंडळ हे मुंबईतील लोअर परळ या हॉटस्पॉटच्या जागी आहे; जिथे दहीहंडी पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. येथे मुंबईतील अनेक पथके येऊन मानवी मनोरे रचतात आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. लाइव्ह म्युझिक, डीजेसह अनेक गोविंदा पथके हा सण उत्साहात साजरा करतात.
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मंडळ, घाटकोपर
पारंपरिक जन्माष्टमीच्या अनुभवासाठी तुम्ही नक्कीच घाटकोपर येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मंडळाला भेट दिली पाहिजे. येथे दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. अनेक गोविंदा पथके ही दहीहंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. या ठिकाणची दहीहंडी एका विशिष्ट उंचीवर बांधली जाते. त्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पथके प्रयत्न करतात आणि आपलं नशीब आजमावून पाहतात.
बाळ गोपाळ मित्र मंडळ, लालबाग
गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेले लालबाग हे कृष्ण जन्मासाठीदेखील तितकेच प्रसिद्ध आहे. बाळगोपाळ मित्र मंडळामार्फत येथील दहीहंडीचे आयोजन केले जाते. हे ठिकाण स्पर्धात्मक दहीहंडीसाठी ओळखले जाते. इथे मुंबईकर मोठ्या संख्येने गर्दी करतात. उंच असा मानवी मनोरा रचून ही दहीहंडी फोडण्यासाठी अनेक पथके हजेरी लावतात.
हेही वाचा… डान्स करता करता मुलानं झटकला मुलीचा हात; ‘त्या’ समारंभात नेमकं घडलं तरी काय? VIRAL VIDEO एकदा पाहाच
जोरदार संगीत आणि उत्सवमय वातावरण पाहायला जमलेले प्रेक्षक दहीहंडी पाहण्यात अगदी रमून जातात. मुंबईतील दहीहंडीचा थरारक अनुभव अनुभवायचा असेल, तर नक्कीच बाळगोपाळ मित्र मंडळ, लालबाग येथे तुम्ही भेट देऊ शकता.
श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळ, खारघर
नवी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले खारघरमधील ‘श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळ’ हे त्यांच्या जन्माष्टमीच्या भव्य उत्सवासाठी ओळखले जाते. अनेक वर्षांपासून दहीहंडीच्या उत्सवाचे येथे भव्य प्रमाणात आयोजन केले जात असल्यामुळे येथील दहीहंडीची लोकप्रियता वाढली आहे. तसेच येथील सुव्यवस्थाही या लोकप्रियतेमागचे एक कारण आहे.
अनेक ठिकाणांहून आलेल्या या बाळगोपाळांना उंचावर बांधलेली ही दहीहंडी फोडणे हे एक आव्हानच असते. प्रेक्षकांची गर्दी, लाइव्ह म्युझिकसह हा उत्सव अगदी जल्लोषात साजरा होतो. याच प्रकारे हे मंडळ गोविंदांच्या सुरक्षेवर जास्तीत जास्त भर देते; जेणेकरून येथील प्रेक्षकांना आणि विविध पथकांतर्फे आलेल्या बाळगोपाळांना त्रास होणार नाही.
संस्कृती युवा प्रतिष्ठान, ठाणे
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने संस्कृती युवा प्रतिष्ठानाकडून दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवासाठी मुंबईतील अनेक ठिकाणांहून गोविंदा पथके येथे येतात. ठाण्यात काही मानाच्या दहीहंड्यादेखील लावल्या जातात. दहीहंडीचा उत्सव अनुभवण्यासाठी ठाणे हे सर्वोत्तम मानले जाते. इथे जागोजागी दहीहंड्यांचे आयोजन केले गेल्याचे पाहायला मिळते.
संकल्प प्रतिष्ठान, वरळी
संकल्प प्रतिष्ठानाद्वारे वरळी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सचिन अहिर यांच्या ‘श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून वरळीत या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. येथील दहीहंडीला अनेक दिग्गज कलाकार आपली उपस्थिती दर्शवितात. येथे आयोजित केलेल्या दहीहंडीबरोबर लाखोंच्या बक्षिसांचीदेखील तितकीच चर्चा असते.