Dahi Handi 2024 Funny Dance Video: मुंबई, ठाण्यात दहीहंडी सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक गोविंदा पथके आणि त्यातील बालगोपाळ विविध ठिकाणाच्या प्रसिद्ध, मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक गल्लीबोळांत नाक्या-नाक्यावर, रस्त्यांवर ‘गोविंदा आला रे आला’चे सूर ऐकू येत आहेत. दहीहंडी फोडण्यास जाण्यासाठी शहरातील विविध गोविंदा पथकांची लगबग सुरू आहे. सोशल मीडियावरही दहीहंडीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत. अशातच मुंबईतील दहीहंडी उत्सवातील असा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहिल्यानंतर आजही अनेकांना आपले हसू आवरणे कठीण होते. हा व्हिडीओ जुना असला तरी दरवर्षी दहीहंडीदरम्यान तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. त्यामुळे हा व्हिडीओ नेमका कोणता आहे ते जाणून घेऊ…
तरुणाचा मजेशीर डान्स पाहून काकांचा संताप
हा व्हिडीओ मुंबईतील बोरिवली मागाठाणे विभागातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यानचा आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दहीहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या स्टेजवर एक नृत्यांगना नृत्य सादर करताना दिसत आहे. स्टेजसमोर गोविंदांची मोठी गर्दी आहे. यावेळी गर्दीतून एक गोविंदा थेट स्टेजवर चढतो आणि नृत्यांगनेसमोर हास्यास्पदरीत्या नाचू लागतो. यावेळी तरुणाचा डान्स आणि हावभाव पाहून उपस्थित लोकही जोरजोरात हसू लागतात. तरुण दोन स्टेप्स मारत नाही तोवर स्टेजवर संतापलेली एक काक तरुणाला खाली उतरवण्यासाठी जोरात धावत येतात; पण तोवर तरुण खाली उतरलेला असतो. अगदी काही सेकंदांचा हा व्हिडीओ आहे; जो पाहिल्यानंतर आजही हसू येते.
दहीहंडी उत्सवातील तरुणाचा मजेशीर डान्स
दरम्यान, आता हा मजेशीर व्हिडीओ @Lonavala.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “तिच्यापेक्षा… तर तो भारीच नाचला आपला भाऊ” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चांगला तर नाचत होता.” अशा प्रकारे युजर्स एकापेक्षा एक मजेशीर कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
दरम्यान, दरवर्षी बोरिवलीतील मागाठाणे विभागातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने देवीपाडा मैदानात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येतात. त्याशिवाय अनेक कलाकार मंडळी आणि विविध सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळते.