Dahi Handi 2024: देशभरात येत्या २७ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यात मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील दहीहंडी म्हणजे एक वेगळा जोश, उत्साह असतो.’अरे बोल बजरंग बली की जय’ म्हणत बाल गोपाळ एकमेकांच्या साथीने उंचच उंच मानवी मनोरे रचतात. मुंबई आणि आसपासच्या शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याची मान मिळावा यासाठी गोविंदा पथकांची धडपड सुरु असते. त्यांच्या या जोशाला यंदाही अनेक गोविंदा पथक मुंबईत मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकूणच मुंबईतील दहीहंडीनिमित्त एक वेगळा माहोल, उत्साह असतो. जर तुम्हालाही मुंबईतील दहीहंडी उत्सवाचा अनुभव घ्याचा असेल तर मुंबई आणि परिसरातील पाच प्रसिद्ध आणि मानाच्या दहीहंड्यांना नक्की भेट देऊ शकता…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संकल्प प्रतिष्ठान, जांबोरी मैदान, वरळी

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांच्या ‘श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून वरळीत मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. वरळीतील जी. एम. भोसले मार्गावरील जांबोरी मैदानावर ही दहीहंडी बांधली जाते. ही दक्षिण मुंबईची सर्वांत उंच आणि मानाची दहहंडी मानली जाते. या दहीहंडीला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहत असल्याने ही दहीहंडी प्रसिद्ध आहे.

Read More Dahi Handi Related News : Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री का साजरा केला जातो? जाणून घ्या रंजक कथा

छबिलदास लेन, दादर

मुंबईतील दादर परिसरात साजरा होणारा हा दहीहंडी उत्सव सर्वांत मोठा दहीहंडी उत्सव आहे. येथे फक्त तरुण गोविंदांचीच पथके नाही, तर तरुणींच्या पथकेही मटकी फोडण्याचे प्रयत्न करतात. हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमते.

वांद्रे कॉलनी दहीहंडी, वांद्रे

भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या पुढाकाराने वांद्रे कॉलनी येथे दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सर्वांत लक्षवेधी दहीहंडी म्हणून या दहीहंडीचा नावलौकिक आहे. मुंबईतील अनेक मोठ्या दहीहंडी पथकांना येथे येण्यासाठी खास आमंत्रण दिले जाते. तसेच ही हंडी मुंबईच्या जवळ असल्याने इथे बाळगोपाळांसह बघ्यांची मोठी गर्दी असते.

मागाठाणे दहीहंडी, बोरिवली

शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. ही राजकीय दहीहंडी असल्याने येथे हंडी फोडण्यासाठी मुंबईभरातून गोविंदांचे संघ पोहोचतात. दरवर्षी लाखोंची बक्षिसेही येथे ठेवली जातात. येथे टीव्ही आणि बॉलीवूड जगतातील सेलिब्रिटीही दरवर्षी सहभागी होतात.

संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’मार्फत बांधण्यात येणारी दहीहंडी म्हणजे ठाण्यातील एक प्रसिद्ध दहीहंडी महोत्सव आहे. गेल्या काही वर्षांत या महोत्सवाने एक प्रभावी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. २०१२ मध्ये जय जवान गोविंदा मंडळाने येथे ४३.७९ फूट आणि ९ थरांचा मानवी मनोरा रचून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नाव नोंदवले, तेव्हापासून दरवर्षी होणारा हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी बॉलीवूड आणि राजकारणातील सर्व सेलिब्रिटी येथे पोहोचतात. ठाणे जिल्ह्यातील वर्तकनगर भागातील महापालिकेच्या शाळा परिसरात याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत येथील बक्षिसांची रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. यावेळी ठाण्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi 2024 go go go govinda 5 places in mumbai and thane to experience grandest krishna janmashtami and dahi handi celebration sjr