Jai Jawan Govinda Pathak 10 Thar Video: राज्यभरात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. विशेषत: मुंबई, ठाण्यात दहीहंडीनिमित्त गोविंदांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. त्यात यंदा तरी मुंबईत गोविंदा पथकांचा १० थरांचा थरार पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी गोविंदा पथकांनी १० थरांचा सरावही केला होता; मात्र नऊ थरांपलीकडे एकाही गोविंदा पथकाला मजल मारता आली नाही. मुंबईतील सर्वांत उंच मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड जय जवान या गोविंदा पथकाच्या नावे आहे. हे गोविंदा पथक दरवर्षी नऊ थर रचून मुंबईसह उपनगरातील मानाच्या अनेक प्रसिद्ध हंड्या फोडताना दिसते. मात्र, यंदा नेहमीच्या शिस्तबद्ध पद्धतीनेच; पण १० थर लावून हंडी फोडत, ते स्वत:च्याच नऊ थरांचा विक्रम मोडण्याच्या तयारीत होते. नयासाठी त्यांचा १० थरांचा सरावही झाला होता. मात्र ठाण्यात संस्कृती प्रतिष्ठानची हंडी फोडताना जय जवान पथकाने मुसळधार पावसात कडक ९ थर लावले. यावेळी एकावर एक चार एक्क उभे करताना गोविंदा डगमगले ९ थरावर पोहोचून खाली कोसळले. यामुळे जय जवान पथकाचे विश्वविक्रमाचे स्वप्न यंदाही अपूर्णचं राहिले, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल. पण यावेळी १० थर रचताना गोविंदाची चुक नेमकी कुठे झाली, हे व्हिडीओमध्ये पाहू शकता.
जय जवान पथकाचा थर रचतानाचा हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी भव्य दडीहंडी उत्सवाचं आयोजन केले जाते. यात दहीहंडी उत्सवादरम्यान जय जवान पथकाने १० थर लावण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. पथकाने ६ थर व्यवस्थितरित्या रचले मात्र ६ थरावरील एक्क्यावरील गोविंदा थोडा डगमगला, त्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, मात्र त्यानंतरही मोठ्या प्रयत्नांनी गोविंदांनी कडक ९ थर रचले, त्यानंतर सर्व गोविंदा खाली कोसळले. त्यामुळे पथकातील गोविंदांनी एवढ्या दिवसांपासून केलेली मेहनत आणि १० थर रचण्याचे पाहिलेले स्वप्न यंदाही अपूर्ण राहिले. यावेळी जय जवान गोविंदा पथक दहा थर रचणार हे पाहण्यासाठीही गोविंदांनी तुफान गर्दी केली होती, मात्र यावेळी त्यांचीही निराशा झाली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.
जय जवान गोविंदा पथकाचा हा व्हिडीओ bond619 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, एक्ते घेणाऱ्याला शिडीचा सपोर्ट भेटला असता तर १० थर लागले असते. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, जय जवान गोविंदा पथक परफेक्ट ९ थर, १० व्या थराचा प्रयत्न हुकला, चांगला प्रयत्न होता, जय जवान गोविंदा पथक पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा, अशा अनेक कमेंट्स युजर्स करत आहेत.