Dahisar Marathi Language Dispute : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये वारंवार मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना समोर येत आहेत. मराठी बोलण्यावरून अनेकदा हे वाद झाले आहेत. यावेळी मराठी माणसाला आणि मराठी भाषेला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. अशात मुंबईतील दहिसर रेल्वेस्थानकावरील तिकीट काउंटरवर मराठी भाषेतील संवादावरून वादाची घटना घडली आहे. तिकीट काउंटरवरील महिलेने “मराठी भाषा माझ्यासाठी काही गरजेची वाटत नाही”, म्हणत प्रवाशाबरोबर अरेरावी केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठी भाषा आपल्याच घरात हाल सोसतेय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. याप्रकरणी आता संबंधित महिला कर्मचाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

मराठी भाषेविषयीची द्वेषभावना पाहून राज्य सरकारवर उठवली टीकेची झोड

एकीकडे मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, मात्र त्याच भाषेविषयीची ही द्वेषभावना पाहून अनेकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कारण मुंबईत अशा घटना वारंवार घडत असतानाही कोणतीही कडक कारवाई केली जात नाही, त्यामुळे अनेक मराठी भाषिकांनी मराठी येत नसतानाही मुजोरी, अरेरावी करणाऱ्या लोकांना मुंबईबाहेर हाकलून देण्याची मागणी केली आहे.

“मला मराठी भाषा गरजेची वाटत नाही, मी इंग्रजी भाषेला महत्त्व देते.”

दहिसर रेल्वेस्थानकाच्या तिकीट काउंटरवरील व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका प्रवाशाचा तिकीट काउंटरवरील अमराठी महिलेबरोबर मराठी भाषेवरून वाद झाला. सुरुवातीला या महिला कर्मचाऱ्याने संबंधित मराठी भाषिक प्रवाशाला १०० रुपये सुट्टे देण्यावरून सुनावले. यावेळी त्या अमराठी महिला कर्मचाऱ्याने प्रवाशाला अरेरावी करत म्हटले की, “मला मराठी भाषा गरजेची वाटत नाही, मी इंग्रजी भाषेला महत्त्व देते.” हे शब्द ऐकून मराठी प्रवासी संतापला आणि त्यानेही महिला कर्मचाऱ्याला सुनावण्यास सुरुवात केली. यावेळी दुसरी एक महिला कर्मचारी तिथे आली आणि तिने काय झालं असं विचारत त्या महिला कर्मचाऱ्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, तसेच प्रवाशाची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण, प्रवाशाला ते सहन न झाल्याने त्याने मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या कर्मचाऱ्याला जाब विचाण्यास सुरुवात केली.

“मराठी येत नसेल तर जा ना सोडून, मेहरबानी करता का आमच्यावर…”

व्हिडीओमध्ये तुम्हाला मराठीत एक प्रवासी बोलताना ऐकायला येत असेल, ज्यात प्रवासी व्हिडीओ कॅमेरा ऑन करून मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला विचारतोय की, “आता बोला महाराष्ट्रात राहून मराठी बोलणं गरजेचे नाही का?” यावेळी तिथे एक मराठी कर्मचारी येते आणि म्हणते की, “मला सांगा काय झालं, मी सांगते तुम्हाला”, ज्यावर तो प्रवासी संतापून उत्तर देतो की, “ही महिला कर्मचारी मराठी भाषेविषयी असं का बोलली, त्यांना माहिती नाही का, मुंबईत मराठी भाषा नेमकी काय आहे ते. महाराष्ट्रात काम करता ना, मग मराठी येत नसेल तर जा ना सोडून, मेहरबानी करता का आमच्यावर इथे काम करायला येता ते… भाषा नाही जमत तर जा. १०० रुपयांसाठी मला एवढे शब्द सुनावतात. तुम्हाला मराठी येत नाही मग कशाला येता महाराष्ट्रात? ह्या मॅडम सांगतात, मराठी भाषा मला गरजेची वाटत नाही, मी इंग्रजीला महत्त्व देते. तुम्हाला मराठीचं वावडं काय आहे ते आम्ही दाखवतो.” यावेळी तो प्रवासी महिला कर्मचाऱ्याला आयडी कार्ड दाखवण्याची मागणी करतो. पण, यावर कर्मचारी काहीच उत्तर देत नाही, पण दुसरी एक कर्मचारी त्या प्रवाश्याला आत केबिनमध्ये येऊन बोलण्याची मागणी करते, पण प्रवासी त्यास नकार देतो आणि मराठी भाषेच्या अपमानाविषयी जाब विचारणं सुरूच ठेवतो. दरम्यान, या व्हिडीओवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“हाकलून द्या अश्यांना इथून…” युजरचा तीव्र संताप

मराठी भाषेच्या अपमानाचा हा संतापजनक व्हिडीओ @mns_rajthackeray नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट करत संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे. एका युजरने लिहिले की, “खूप छान वाटतं मराठीवर अन्याय झाला की डायरेक्ट भिडून जातात आपली मराठी माणसं…” दुसऱ्याने लिहिले की, “हाकलून द्या अश्यांना इथून…” तिसऱ्याने लिहिले की, “तिला तिची जागा दाखून द्या, भाऊ एक नंबर, महाराष्ट्रात राहून ही बाई मराठीत बोलता येत नाही म्हणते, एवढी कशी यांच्यामध्ये डेरिंग येते. भाऊ तुम्ही बरोबर बोलले.” शेवटी एकाने लिहिले की, “महाराष्ट्रात राहून मराठी मातृभाषा ही आलीच पाहिजे… येत नसेल तर शिकून घ्या, मराठी माणसाच्या नादाला लागू नका… महाराष्ट्रात राहून मातृभाषेतच बोलायचं, इंग्लिश फाडायची असेल तर निघा, इथे फुकटचे येऊन भरलेत. आमच्या भाषेचा अपमान झाला तर मराठी माणूस सळो की पळो करेल तुम्हाला…. त्या दुसऱ्या मॅडम सॉरी आता होणार नाही असं बोलतात, पण त्याही मराठी आहेत ना; त्यांना मराठीचा झालेला अपमान पाहून लाज वाटत नाही का?”

दरम्यान, या घटनेवर आता रेल्वे प्रशासन नेमकं काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मराठी भाषेच्या वारंवार होत असलेल्या अपमानाबाबतही सरकार कोणती कडक आणि ठोस भूमिका घेणार यावरही सर्वांचे लक्ष आहे.

Story img Loader