फ्लॅश मॉब हा असा एक प्रकार आहे ज्यात आपण समाजासोबत एकत्र येऊन नाचण्या-गाण्याचा मनमुराद आनंद लुटतो. यावेळी आपल्याला कशाचेच भान नसते. मनातील सर्व विचार, आपापसातले मतभेद विसरून आपण सर्व एकमेकांमध्ये मिसळून त्या क्षणाचा आस्वाद घेतो. अशाच एका प्रसंगी केरळच्या जिल्हाधिकारीही स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि त्या एका फ्लॅश मॉबमध्ये सामील झाल्या.
मध्य केरळमधील पथनमथिट्टाच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस अय्यर यांनी विद्यार्थ्यांच्या फ्लॅश मॉबमध्ये सामील होऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी कॅथोलिकेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
केरळ राज्यातील मध्य त्रावणकोर प्रदेशात स्थित, पथनमथिट्टा ही नगरपालिका आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की डॉ. दिव्या या विद्यार्थ्यांसह ‘रामलीला’ चित्रपटातील रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या ‘नगाडा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या डान्स मूव्ह्सने सर्वांनाच प्रभावित केले.
निथू रघुकुमार नामक ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत डान्स केला! महात्मा गांधी विद्यापीठ कला महोत्सवाची घोषणा करण्यासाठी जिल्हा स्टेडियममध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या फ्लॅश माॅबमध्ये पथनमथिट्टा जिल्हाधिकारी दिव्या एस अय्यर आयएएस डान्स करत आहेत.” नेटकऱ्यांना जिल्ह्याधिकाऱ्यांचा हा डान्स फारच आवडला आहे.
मातृभूमीनुसार, महात्मा गांधी विद्यापीठ, कोट्टायमच्या कला महोत्सवाच्या तयारीची देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा स्टेडियमवर आल्या होत्या, तेव्हा त्यांनी डान्सचा आनंद लुटला. फ्लॅश मॉब त्याच्या शेवटच्या टप्प्यात होता, परंतु आयएएस अधिकारी स्वत:ला रोखू शकल्या नाहीत.
डॉ. दिव्या म्हणाल्या की, “मला वाटले की मी फक्त काही स्टेप्स करेन, पण त्यांची ऊर्जा प्रचंड होती. ती ऊर्जा फ्लॅश मॉबचे संपूर्ण सार आहे.” त्यांनी हेही सांगितले की कोणीतरी त्यांचा व्हिडीओ करत आहे हे त्यांना माहीतच नव्हते.