उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी एका अतीउत्साही नवरदेवाला वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या दिवशीच ठोठावण्यात आलेल्या या दंडाची रक्कम थक्क करणारी आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांअंतर्गत या नवरदेवाला तब्बल दोन लाखांचा दंड ठोठावलाय.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन लाखांचा दंड ठोठावण्याइतकं काय मोठं घडलं. तर सामान्यपणे लग्नमंडपासमोर किंवा हॉलमध्ये नाचण्याऐवजी हा नवरदेव धावत्या गाडीमधून बाहेर लटकून नाचत होता आणि सेल्फी काढत होता. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलंय. हा नवरदेव अशाप्रकारे स्वत:चा आणि रस्त्यावरील इतरांचा जीव धोक्यात टाकून जात असतानाच अंकित कुमार या व्यक्तीने त्या अजब वरातीचा व्हिडीओ काढून उत्तर प्रदेश पोलिसांना ट्विट केला. अंकितने पोलिसांनी या व्यक्तीविरोधात कारवाई करावी अशी विनंतीही ट्विटमध्ये केलेली.
“हरिद्वारवरुन नोएडाला जाताना मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये काही लोक मला अशापद्धतीने स्वत:च्या मनोरंजनासाठी लोकांचा जीव धोक्यात टाकताना दिसले. या प्रकरणाची पोलीस दखल घेतील अशी अपेक्षा आहे,” असं ट्विट अंकितने केलं होतं. या ट्विटमधील व्हिडीओमध्ये नवरदेव हा गाडीच्या फूटबोर्डवर उभा असून सेल्फी घेताना दिसत आहे. तर आजूबाजूने त्याचे मित्र जीव धोक्यात टाकून अर्ध अंग गाडीच्या खिडक्यांमधून आणि दारांमधून बाहेर झोकून देत फोटो काढताना दिसतायत.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर व्हिडीओमधील नंबर प्लेट्सच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली. नवरदेवाच्या ताफ्यातील तब्बल नऊ गाड्यांना वेगवेगळ्या नियमांचं उल्ल्घन केल्याप्रकरणी दंड ठोठावला. या नऊ गाड्यांकडून पोलिसांनी दोन लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल केलाय. व्हिडीओ पोस्ट करत पोलिसांनीच ही माहिती दिली आहे.
वाहतूक पोलीस खात्याचे पोलीस निरिक्षक कुलदीप सिंह यांनी, व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी कारवाई करुन दोन लाखांचा दंड वसूल केलाय, अशी माहिती दिली. यापुढेही अशाच प्रकारची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.